|Sunday, June 17, 2018
You are here: Home » क्रिडा » गोविंदन लक्ष्मणनला सुवर्णपदक

गोविंदन लक्ष्मणनला सुवर्णपदक 

वृत्तसंस्था/ गुंटूर

आंध्रप्रदेशमधील गुंटूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी तामिळनाडूच्या गोविंदन लक्ष्मणनने पुरूषांच्या 5000 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन नवे स्पर्धा विक्रम नोंदविले गेले.

आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या तामिनाडूच्या गोविंदन लक्ष्मणनने पुरूषांच्या 5000 मी. धावण्यांच्या शर्यतीत 14 मिनिटे, 07.76 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. उत्तराखंडच्या मानसिंगने रौप्यपदक तर महाराष्ट्राच्या कालीदास हिरवेने कास्यपदक मिळविले. 27 वर्षीय लक्ष्मणनने भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. तो पुढील महिन्यात लंडन येथे होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या 5000 मी. धावण्यांच्या शर्यतीत लोगनाथन सुरियाने, महिलांच्या 400 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत अनु राघवनने तर महिलांच्या हातोडा फेकमध्ये सरिता सिंगने नवे स्पर्धा विक्रम नोंदविले.

तामिळनाडूच्या लोगनाथन सुरियाने 5000 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 15 मिनिटे, 46.92 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडाप्रकारात संजीवनी जाधवने रौप्यपदक तर दिल्लीच्या प्रेणु यादवने कास्यपदक मिळविले. महिलांच्या 400 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत केरळच्या अनु राघवनने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविताना 57.21 सेकंदाचा अवधी घेतला. ओदिशाच्या जेना मुरमूने रौप्यपदक तसेच गुजरातच्या सरिता गायकवाडने कास्यपदक मिळविले. पुरूषांच्या 400 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत आंध्रच्या एम पी जबीरने सुवर्ण, एम रामचंद्रनने रौप्य आणि तामिळनाडूच्या संतोषकुमारने कास्यपदक मिळविले. महिलांच्या हातोडा फेकमध्ये सरिता सिंगने 63.22 मी.चे अंतर नोंदवित नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक, उत्तरप्रदेशच्या गुंजन सिंगने रौप्यपदक आणि पंजाबच्या  सरबजीत सिंगने कास्यपदक घेतले.

Related posts: