|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कलाकारांनी ‘ग’ची बाधा होऊ देऊ नये

कलाकारांनी ‘ग’ची बाधा होऊ देऊ नये 

प्रतिनिधी/ पणजी

“कलाकारांनी कधीही ‘ग’ म्हणजे गर्वाची बाधा होऊ देऊ नये. म्हणजेच कलाकारांनी नेहमीच विनम्र असावे. जे सप्तसूर आहेत तेच संगीत व संगीत हेच जीवन आहे. परमेश्वराने दिलेल्या सृष्टीसौंदर्य व शरीराचा आनंद आपण घ्यावाच पण त्याचा उपयोग इतरांसाठीही करावा. या ‘ग’ ची बाधा आज समाजातल्या सर्वांनाच झालेली दिसून येते. पण कलाकारांनी या ‘ग’ची म्हणजेच गर्वाची बाधा होऊ देऊ नये व त्यांचे पाय नेहमी जमीनीवरच राहावेत. कारण गर्वाचे घर नेहमी खालीच असते’’ असे प्रतिपादन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पणजीतील कला अकादमीच्या कृष्ण कक्षात आयोजित त केलेल्या ‘स्वरांजली’ कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमामध्ये गावडे व पद्मश्री प्रसाद सावकार यांच्याहस्ते गोमंतकीय शास्त्रीय गायिका शकुंतला भरणे यांच्या ‘क्लासिकल रेन्डिशन्स’ या शास्त्रीय गायनावर व संगीतावर तसेच रागांवर आधारीत ध्वनीफितीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गोमंतकीय शास्त्रीय गायक सचिन तेली यांचे शास्त्रीय गायन खास रंगले.  

 

गीत शकुन, कला अकादमी आणि कला व संस्कृती संचालनालय या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण कैलासवासी श्रीमती गंगुबाई हनगल या थोर गोमंतकीय शास्त्रीय गायिकेच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ श्रध्दांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये यावेळी व्यासपीठावर मंत्री गावडे यांच्यासह थोर नाटय़कलाकार व गायक पद्मश्री प्रसाद सावकार, हेदे उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रफुल्ल हेदे, लेखिका हेमा नायक तसेच कार्यक्रमाचे आयोजक शैलेश भरणे यांची उपस्थिती होती. आपल्या भाषणामध्ये बोलताना पंडित प्रसाद सावकार यांनी गायिका शकुंतला भरणे यांचे कौतुक केले व त्यांचे गाणे पुर्वीपेक्षा फारच सुधारले असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे गोव्यातील संगीत नाटकाच्यावेळी, विशेषतः संगीत कटय़ार काळजात घुसली व संगीत मंदारमाला या नाटकांच्या प्रयोगांच्यावेळी घडलेले काही किस्से व आठवणी सांगितल्या. 

 

जीवन हेच संगीत आहे  

‘सारेगमपधनी’ या सप्तस्वरांवर आपले विचार मांडताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की ‘स’ म्हणजेच जीवनात सकारात्मकता ठेवणे महत्वाचे आहे. ‘रे’ म्हणजेच रेग्युलारिटी म्हणजेच आयुष्यात प्रत्येक गोष्टीची वेळ पाळणे व नियमितता महत्वाची आहे. ‘म’ म्हणजेच मधाळ बोलणे आवश्यक आहे. ‘प’ म्हणजेच परमेश्वराची उपासना करणे व ज्या परमेश्वराने आपल्याला सुंदर शरीर दिलेले आहे व सृष्टीसौंदर्य बहाल केलेले आहे त्याचा आस्वाद घेणे व इतरांसाठीही त्याचा वापर करणे आवश्यक आहे. ‘ध’ म्हणजेच धनाची अथवा संपत्तीची मस्ती जेव्हा मस्तकात शिरते तेव्हा मोठ-मोठय़ा धनाडय़ांचीही वाताहात झाल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे संपत्तीचा गर्व अथवा अहंकार असू नये. त्याचबरोबर ‘नी’ म्हणजेच आपल्या आयुष्यावर, भावनांवर सर्वात महत्वाचे म्हणजे रागावर आपले नियंत्रण असणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे जीवन हेच संगीतप्रमाणे आहे, नपेक्षा जीवन हेच संगीत असल्याचे स्पष्ट करताना गावडे यांनी संगीताचे आयुष्यातील असाधारण महत्व अधोरेखित केले.       

 

सचिन तेली व निनाद दैठणकर यांचे सादरीकरण रंगले

गोमंतकीय गायक सचिन तेली यांचे बहारदार गायन यावेळी चांगलेच रंगले. उपस्थित श्रोत्यांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचा चांगल्यापैकी आस्वाद घेतला. अमर मोपकर यांनी तेली यांना तबलासाथ केली. दत्तराज म्हाळशी यांनी संवादिनीवर साथ केली.  चहापानानंतर निनाद दैठणकर यांचे संतुरवादनही रंगले. नंतर मुंबई येथील शशी व्यास याने किशोरीताई आणि त्यांची गायकी यावर व्याख्यान दिले. शकुंतला भरणे, पं. डॉ. शशांक मयेकर यांच्या शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना सुभाष फातर्पेकर, दत्तराज म्हाळशी, मयंक बेडेकर, रोहिदास परब, अमर मोपकर व अभिजित बारटक्के यांनी संगीत साथ दिली.

Related posts: