|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रूमडामळ – दवर्ली पंचायतीच्या ग्रामसभेत मदरशावरुन गदारोळ

रूमडामळ – दवर्ली पंचायतीच्या ग्रामसभेत मदरशावरुन गदारोळ 

प्रतिनिधी/ फातोर्डा

रूमडामळ-दवर्ली पंचायतीच्या नव्या मंडळाच्या कार्यकाळातील पहिलीच ग्रामसभा रविवारी गदारोळात आटोपती घ्यावी लागली. सुरुवातीलाच काही ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्यास विरोध दर्शविताना सर्व पंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी अथवा ती पुन्हा दुसऱया रविवारी बोलवावी अशी मागणी केली. मात्र सरपंच कुठल्याही पंचावर तशी सक्ती करू शकत नाहीत, असे यावेळी पंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले.

पंचायत क्षेत्रात उत्तर प्रदेशातील काही लोकांनी नव्यानेच मदरसा सुरू केला असल्याचा दावा झाल्याने बराच गोंधळ माजला. सदर 1 हजार चौरस मीटर जागेचे दोन भाग पाडण्यात आलेले असून एकामध्ये मदरसा व दुसऱया बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी जागा ठेवण्यात आली असल्याचे काही ग्रामस्थांनी पंचायतीच्या नजरेस आणून दिले. पण मागे शिवजयंतीच्यावेळी भांडण होण्याचा प्रकार घडला होता. पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून कुठल्याही धर्माचे उपक्रम तिथे राबविण्यास मनाई करावी अशी मागणी झाली असता पंचायतीने ती मान्य केली.

एका भ्रमणध्वनी कंपनीच्या इमारतीवरील लहान मनोरा हटविण्याची मागणीही बैठकीत भरपूर गाजली. मात्र मनोऱयाशी संबधित व्यक्तीने आधी जुना मोठा मनोरा हटवावा, असा मुद्दा रेटून धरल्यानंतर शेवटी दोन्ही मनोरे हटविण्याचा निर्णय पंचायतीने घेतला.

पंचायतीकडे असलेली रिक्षा दीड महिन्यापासून गायब असल्याच्या मुद्यावरूनही बराच गोंधळ माजला. शेवटी सरपंच सोफिया शेख यांनी सदर रिक्षा माजी पंच मुरतुजा कुकनूर यांनी दुरुस्तीसाठी दिली असल्याचे स्पष्ट केले.

ग्रामस्थांकडून विविध मागण्या

या भागात दिवसभर पोलीस गस्त राहावी, सरकारी शाळा आणि मारूती मंदिर जंक्शनजवळ वाहतूक पोलीस नेमावेत, अवजड वाहनांना पंचायत क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी वेळ ठरवून द्यावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केला. मैदानाच्या ठिकाणी फाटक बांधण्यासाठी गेल्या ग्रामसभेत मांडलेला प्रस्ताव, अचानक बंद झालेल्या बसथांब्यामुळे ग्रामस्थांना होणारे त्रास, प्रभाग 6 मधील एका इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत झालेले बेकायदा बांधकाम, रस्ता बांधण्यासाठी ठेवलेल्या जागी बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेली घरे हेही मुद्दे बैठकीत उपस्थित झाले.

खासदार निधीतून रुग्णवाहिका म्हणून वापरण्यासाठी व्हॅन मिळविण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थ दामोदर वाकुडे यांनी केली असता ती पंचायतीने मान्य केली. या ग्रामसभेस सरपंच सोफिया शेख, उपसरपंच मधुकला शिरोडकर, पंच अविता चोडणकर, इशा नाईक, विश्वासदास नाईक, विनायक वळवईकर आणि पंचायत सचिव ख्रिस्तोफर फारिया यांची उपस्थिती होती.

Related posts: