|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आठपैकी सहा बंधारे पाण्याखाली

आठपैकी सहा बंधारे पाण्याखाली 

प्रतिनिधी /चिकोडी :

सुरुवातीला संततधार सुरू झालेल्या पावसाचा सलग तिसऱया दिवशी जोर कायम राहिला आहे. त्यामुळे चिकोडी तालुक्यातील एकूण आठपैकी सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात सुरू असलेली संततधार व महाराष्ट्रात धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस यामुळे वेदगंगा तसेच दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. नदीकाठचा परिसर हा बहुतांशी धोक्याच्या पातळीनजीक गेला असल्याचे दिसून आले.

गुरुवारी दिवसभर तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. अधून मधून मोठय़ा सरीही येत होत्या. तालुका प्रशासनाकडील माहितीनुसार गुरुवारी चिकोडी पर्जन्यमापन केंद्रात 37.9 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तसेच अंकली (23.4 मि. मी.), नागरमुन्नोळी (19.6), सदलगा (41.4), गळतगा (47.2), जोडट्टी (9.8), निपाणी पीडब्ल्यूडी (64.4), निपाणी एआरएस (53.0) व सौंदलगा पर्जन्यमापन केंद्रात 64.3 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

महाराष्ट्रातील 105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात गुरुवारअखेर 59.62 टीएमसी इतका पाणीसाठा होता. तर 34.2 टीएमसी क्षमतेच्या वारणा जलाशयात 23.33 टीएमसी, 8.36 टीएमसी क्षमतेच्या राधानगरी जलाशयात 6.79 टीएमसी आणि 25.40 टीएमसी क्षमतेच्या काळम्मावाडी धरणात 14.67 टीएमसी इतका पाणीसाठा होता. या धरणक्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा व दूधगंगा या नद्यांची पाणीपातळी झपाटय़ाने वाढत आहे. यामुळे कल्लोळ, कारदगा, भोज, सिदनाळ, जत्राट, मलिकवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित सदलगा व एकसंबा हे बंधारेही पाण्याखाली जाणार आहेत.