|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोन लाखाची बॅग लांबविण्याचा प्रयत्न फसला

दोन लाखाची बॅग लांबविण्याचा प्रयत्न फसला 

वार्ताहर/ निपाणी

शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱया चनम्मा सर्कल परिसरात सिद्धोजीराजे स्टेडियम येथील पालिका गाळय़ामध्ये दोन लाखाची रोकड असणारी बॅग लंपास करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना गुरुवारी घडली. पण चोरटय़ांनी कागदपत्रे असणारी बॅग पळवून नेली.

याबाबत अधिक माहिती अशी, कुन्नूर येथील रहिवाशाने निपाणीत येऊन स्टेट बँकेतून दोन लाखांची रक्कम काढली. ही रक्कम बॅगेत ठेवून चनम्मा सर्कल येथे असणाऱया सिद्धोजीराजे स्टेडियम येथील मित्राच्या व्यावसायिक गाळय़ामध्ये पोहोचला. यावेळी या नागरिकाने आपल्या मित्राकडे रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी बॅग दिली व दुसरी कागदपत्रे असणारी बॅग बाजूलाच ठेवली.

यानंतर दोघे मित्र कर्मचारी दुकानात असल्याने बाहेर गेले. याच संधीचा फायदा उठवत लक्ष ठेवून असलेल्या अज्ञात चोरटय़ांनी ठेवलेली बॅग ही पैशाची असावी असे समजून उचलली व पोबारा केला. ज्यावेळी दोघेही दुकानात परतले त्यावेळी बॅग नसल्याची गोष्ट लक्षात आली. यावरून टेहाळणी करणाऱया चोरटय़ाने रक्कम हडप करण्याच्या इराद्याने कागदपत्रे असलेली बॅग पळविल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांशी संपर्क साधण्याची गरज

सातत्याने शहरात होणाऱया चोरींच्या घटनांमुळे नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांना पकडण्यात यावे अशी मागणी शहरावासीयातून होत असून त्याकामी पोलिसांनी आपली चक्रे गतीमान केल्याचे समजते. चोरीच्या घटना घडल्यानंतर सुज्ञ नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.