|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आबांच्या स्मारकाला मुहूर्त सापडेना !

आबांच्या स्मारकाला मुहूर्त सापडेना ! 

विक्रम चव्हाण/ सांगली

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मारकाचे काम रखडले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी स्मारकाच्या कामाची तातडीने निवीदा प्रक्रिया राबवा असा दिलेला आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने बासनात गुंडाळून ठेवला आहे. स्मारकासाठी उपलब्ध झालेला 2 कोटी 86 लाख रुपयांचा निधीही जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाकडे पडून आहे. तो सार्वजनिक बांधकामकडे वर्ग करण्यात आलेला नाही. निधी उपलब्ध असतानाही स्मारकाच्या कामाला मुहूर्त सापडत नसल्याने स्व. आर. आर. आबा समर्थकांच्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

येथील महात्मा गांधी वसतिगृहाच्या आवारात स्व. आर. आर. आबांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकामध्ये संग्रहालय, सभागृह, ग्रथांलय, कलादालन यांचा समावेश आहे. कलादालनामध्ये आबांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या चित्रांचा समावेश असणार आहे. या स्मारकाच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. या स्मारकाचे काम जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाने की सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे याबाबत मध्यंतरीच्या काळात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नियमाप्रमाणे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानेच करावे अशा सूचना तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिल्या होत्या. तशी कार्यवाही सुरु करण्याचे आदेशही गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र याला दोन महिने उलटून गेले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आबांच्या स्मारकाचे काम सुरु करण्याबाबत कोणत्याही हालाचाली केलेल्या नाहीत. यामुळे आबा समर्थकांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे.

आबांच्या नियोजीत स्मारकासाठी राज्य शासनाकडे 9 कोटी 86 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाने 19 ऑक्टोंबर 2016 रोजीच मान्यता दिली आहे. निधी मंजूर केला आहे. यातील 2 कोटी 86 लाख रुपयांचा निधी 31 मार्च 2017 रोजी राज्य शासनाकडून जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र स्मारकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करुन घेण्यात येणार असल्याने हा निधी तात्काळ सार्वजनिक बांधकामकडे वर्ग करा असे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाला दिल्या होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मागणीचे पत्र आले नसल्याने निधी वर्ग करण्यात आलेला नाही. निधी जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाकडे पडून आहे. स्व. आर. आर. आबांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आबाप्रेमींची इच्छा आहे. राज्य शासनानेही या स्मारकाला निधी कमी पडू देणार नसल्याचे म्हंटले आहे.

तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे स्मारकाचे काम रखडले आहे. याबाबात जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही निधी वर्ग करायला तयारच आहोत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधीची मागणीच करण्यात आलेली नाही. याबाबत लेखी पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे, मात्र त्यांच्याकडून अद्यापही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. यावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आला आहे. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनीच याबाबत लक्ष घालून आबांच्या स्मारकाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आर. आर. आबा समर्थकांच्यामघून होत आहे.

Related posts: