|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ कोरेगावात कडकडीत बंद

उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ कोरेगावात कडकडीत बंद 

एकंबे :

 लोणंद (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या मालकाला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुह्यात खासदार उदयनराजे भोसले यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ कोरेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला. याप्रकरणी पोलीस दलाने चौकाचौकात चोख बंदोबस्त ठेवला होता. 

  खासदार भोसले हे पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, त्याच्या निषेधार्थ समर्थकांनी जिल्हा बंदची हाक दिली. त्याचे पडसाद जिह्यासह कोरेगावात उमटले. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सातारा जकात नाका येथून बंदचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी, उद्योजक व नागरिक बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत सुरु होत्या. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी शहर व परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.