|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाहतूक खात्याचा बनावट शिक्का करुन 3 लाखांना फसविले

वाहतूक खात्याचा बनावट शिक्का करुन 3 लाखांना फसविले 

प्रतिनिधी/ मडगाव

वाहतूक खात्याचा बनावट शिक्का तयार करुन व हा शिक्का असली असल्याचे भासवून मडगावात शाखा असलेल्या एका पतसंस्थेला सुमारे 3 लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर दोघांना लवकरच अटक करण्याच्या मार्गावर पोलीस आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोषकुमार कडप्पा मोरे असे असून तो  न्यू वॉटर टँक, न्यु वाडे, वास्को येथे राहात असल्याचे सरकारी कागदपत्रात म्हटले आहे. (प्रत्यक्षात हा आरोपी या पत्त्यावर नव्हता)

रुमडावाडा- मुरगाव येथील संशयित गौतम गायकवाड व एमपीटी कॉन्लनी, हेडलँड सडा येथे राहाणारा संशयित शाम चंद्रकांत शेटय़े यांना या प्रकरणी लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली.

घोगळ येथे शाखा असलेल्या दी गोकूळ अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीला या प्रकरणात फसविण्यात आलेले आहे. या शाखेचे व्यवस्थापक प्रदीप प्रभुदेसाई यांनी यासंबंधी मडगाव पोलीस स्थानकात वरील आरोपींविरुद्ध फिर्याद केली होती. या फिर्यादीसंबंधीची  पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर वरील आरोपीला अटक केली.

सविस्तर माहितीनुसार आरोपी मोरे यांनी दी गोकूळ अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीकडे 12 जुलै  2016 रोजी संपर्क साधला. त्यांच्याबरोबर संशयित  गायकवाड होते. आपण व्यापारी असून ‘माय विलांकीनी टूर ऍण्ड टॅव्हल्स’ या वाहतूक कंपनीचा आपण भागिदार असल्याचे त्यानी वरील पतसंस्थेला सांगितले.  ज्या आस्थापनात त्यांचे वाहन प्रवाशांची ने – आण करते ते आस्थापन व आपल्यामध्ये झालेल्या करारपत्राची प्रत त्यांनी या पतसंस्थेपुढे सादर केली.

बनावट ‘हायपोथिकेशन कॅन्सल्ड’ नोंद

मोरे यांना 6 लाख रुपयांचे कर्ज हवे होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या (मोरे) नावावर असलेल्या जीए-06-टी-3354 क्रमांकाच्या बसीचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बूक) सादर केले. या आरसी बूकवर ही बस ज्या वित्त संस्थेकडे गहाण म्हणून ठेवण्यात आलेली होती त्या वित्त संस्थेचे कर्ज फेडल्यामुळे या बसवर आता कुठल्याही वित्त संस्थेचा कब्जा नाही असा अर्थ सांगणारा वाहतूक खात्याचा त्यावर शिक्का होता. ‘हायपोथिकेशन कॅन्सल्ड’ असे त्यावर नमूद करण्यात आले होते.

प्रत्यक्षात आरोपी मोरे यांनी चोलामंडलम इन्वेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कं. लि पणजी शाखेकडे कर्ज घेतले होते आणि म्हणून या बसवर चोलामंडलमकडे हायपोथिकेट केली होती. म्हणजेच चोलामंडलम या वित्त संस्थेकडून मारे यांनी कर्ज घेतले होते आणि ते कर्ज फेडले नव्हते किंवा चोलामंडलमचा कब्जा या बसवर अजूनही होता.

आरसी बूक वित्त संस्थेत सादर

आरसी बूक सादर केल्यानंतर आरोपी मोरे यांनी या पतसंस्थेकडून 6 लाख रुपयांचे कर्ज हवे असल्याची विनंती केली. आरोपीने आधार कार्डची प्रत दिली, आयकर भरत असलेली कागदपत्रे दिली, पॅन कार्ड क्रमांक दिला, वाहतूक कराराची कागदपत्रे सादर केलीत.

या कागदपत्रावर आधारुन वरील पतसंस्थेने मोरे यांना 14 जुलै 2016 रोजी 6 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. वरील आणखी दोन संशयित हे मोरे यांना हमीदार म्हणून होते. 15 जुलै 2016 रोजी आरोपी मोरे आरसी बूक घेऊन आला. त्यावर आता ही बस दी गोकूळ अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीकडे हायपोथिकेट केलेली असल्याची नोंद होती.

मोरे यांच्या खात्यात 6 लाख जमा

आरसी बूकवर ही नोंद करण्यात आल्यानंतर पतसंस्थेने मोरे यांच्या या पतसंस्थेतील बचन खात्यात 15 जुलै 2016 रोजी 6 लाख रुपये जमा केले.

पतसंस्थेने सोसायटीची शेअरची रक्कम व सर्व्हीस आकारणी वजा केले.  आरोपी मोरे यांनी या पतसंस्थेतील बचत खात्यातून कर्जाचे 3 लाख रुपये काढले. मोरे यांचे बँक खाते एका राष्ट्रीयकृत बँकेत आहे. मोरे यांनी पतसंस्थेला उर्वरीत रक्कम त्या बँकेत पाठवावे अशी विनंती केली.

आरसी बूकमधील नोंदी बरोबर आहेत का याची खातरजमा करण्यासाठी पतसंस्थेने 18 जुलै 2016 रोजी वाहतूक खात्याच्या वास्को कार्यालयाकडे संपर्क साधला. वाहतूक खात्याकडून मिळालेली माहिती ऐकून पतसंस्थेच्या अधिकाऱयांना धक्काच बसला.

जीए-06-टी-3354 क्रमांकाच्या बसचे हायपोथिकेशन अजूनही चोलामंडलम या वित्त संस्थेकडेच होते. दी गोकूळ अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीकडे ही बस हायपोथिकेट केलेली आहे असा उल्लेख आरसी बूक मध्ये मुळीच नव्हता.

वरील बसचे आरसी बूक वाहतूक खात्याच्या वास्को येथील एका अधिकाऱयाला दाखविला तेव्हा मूळ आरसी बूकमध्ये करण्यात आलेली ‘हायपोथिकेशन कॅन्सेल्ड’ हे खोटे असून वाहतूक खात्याच्या नोंद वहीत अजूनही पूर्वीच्याच (चोलामंडलम) वित्त संस्थेचे नाव असल्याचे स्पष्ट केले.

हकीकत कळल्यानंतर पतसंस्थेने आरोपी मोरे यांच्याकडे संपर्क साधला तेव्हा आपण येऊन कर्जाची रक्कम अदा करतो असे आश्वासन मोरे यांनी पतसंस्थेला दिले. मात्र प्रत्यक्षात काही ते आले नाही आणि कर्जाची रक्कम काही भरली नाही.

दिलेल्या पत्त्यावर मोरे नाहीत

 पतसंस्थेचे अधिकारी मोरे यांच्या घरी गेले तेव्हा मोरे यांनी दिलेल्या पत्त्यावर ते राहात नसल्याचे त्यांना आढळून आले. कधीच त्यांनी हे घर सोडल्याचे त्यांना सांगण्यात आले. याचाच अर्थ असा आरोपी मोरे यांनी इतर दोघांच्या संगनमताने आणि बनावट सरकारी शिक्का तयार करुन या पतसंस्थेला 3 लाख रुपयांना फसविले होते असे पतसंस्थेने तपास यंत्रणेला सादर केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज मलीक यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोषकुमार मोरे यांना बनावट कागदपत्रे सादर करुन फसविल्याच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 465, 468, 471, 420 कलमाखाली अटक केली. इतर आरोपींविरुद्ध लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे तपास यंत्रणेने सांगितले.

Related posts: