|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धार्मिक प्रतिकांच्या तोडफोड प्रकरणी गूढ कायम

धार्मिक प्रतिकांच्या तोडफोड प्रकरणी गूढ कायम 

प्रतिनिधी/ फोंडा

करंजाळ-मडकई येथील ख्रिस्ती दफनभूमीमधील क्रॉस व काही धार्मिक प्रतिकांच्या तोडफोड प्रकरणी छडा लावण्यात फोंडा पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. मात्र एका व्यक्तीवर संशयाची सुई असल्याने त्यादृष्टीने तपासकार्य हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. या घटनेची दखल घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी काल बुधवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला महत्त्वाच्या सूचना केल्या.

सदर ख्रिस्ती दफनभूमित साधारण 12 क्रॉस व थडग्यांची मोडतोड केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला होता. मात्र हा प्रकार नेमका कधी घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकांची तोडफोड करणारा व सध्या पोलिसांच्या अटकेत असलेला फ्रान्सिस्को उर्फ बॉय पेरेरा या संशयिताचीही याप्रकरणी उलटतपासणी करण्यात आली आहे. मात्र त्याच्याकडून पोलिसांना नेमकी कुठली माहिती मिळाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास कार्याच्यादृष्टीने आवश्यक असलेले महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी गोळा केले असून त्या माध्यमातून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.  मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत व बुधवारी पूर्णदिवस घटनास्थळी तपास सुरु होता.

एका व्यक्तीवर संशयाची सुई

दरम्यान खात्रीलायक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी एका मनोरुग्णाकडून या दफनभूमीची कडी तोडण्यात आली होती. हा प्रकार दफनभूमीशी संबंधीत चर्च व्यवस्थापनाच्या लक्षात आला होता. मात्र संशयिताची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे तोडफोड प्रकरणी या व्यक्तीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related posts: