|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उद्यापासून वास्कोत श्री दामोदर भजनी सप्ताह

उद्यापासून वास्कोत श्री दामोदर भजनी सप्ताह 

प्रतिनिधी/ वास्को

वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला उद्या शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. आज गुरूवारी दि. 27 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जोशी कुटुंबियांतर्फे वार्षिक महारूद्र अनुष्ठान, आरत्या, तिर्थप्रसाद होईल. सायंकाळी पुन:प्रतिष्ठापना वर्धापनदिनानिमित्त स्थानिक भजनी कलाकारांचे भजन, आरत्या, तिर्थप्रसाद होईल. सायंकाळी 7 वा. उद्योजक श्रीपाद व संजय शेटय़े यांच्या सौजन्याने श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीतर्फे प्रसिद्ध गायक महेश काळे (अमेरिका) यांच्या गायनाचा खास कार्यक्रम श्री दामोदर मंदिरासमोर उभारलेल्या मंडपामध्ये होणार आहे. त्यांना ऑर्गनवर राया कोरगांवकर, हार्मोनियमवर महेश धामस्कर, तबल्यावर दयेश कोसंबे, पखवाज दत्तराज शेटय़े, मंजिरी राहुल खांडोळकर तर निवेदनाची बाजू डॉ. अजय वैद्य सांभाळतील.

दरम्यान, वास्को शहरात भजनी सप्ताहाची पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण झालेली असून आज संध्याकाळपर्यंत फेरी उभारण्याचे काम पूर्ण होणार आहे. मोठय़ा संख्येने फेरीवाले वास्को शहरात दाखल झाले आहेत. वास्को शहर लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे. भजनी सप्ताहाच्या उत्साहाला उधाण आलेले असून हा उत्साह पुढील आठ दिवस राहणार आहे.

आजपासून वास्कोत वाहतूक बदल

आज दुपारपासून वास्को शहरातील वाहतुकीत बदल होणार आहे. दरवर्षी सप्ताह काळात केवळ एफ. एल. गोम्स मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक होत असते. यंदाही याच मार्गावरून वाहतूक होणार असून सप्ताह काळात वास्को शहरातून होणाऱया अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. या काळात सर्व वाहनचालकांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वास्को वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.

गायक महेश काळे

प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून गायन शिकण्यास सुरवात केली. त्यांची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे वर्ग घ्यायच्या. त्यांच्या सहवासातच त्यांना संगीताची गोडी लागली. पुढे रवींद्र घांगुळे यांच्याकडे त्यांनी काही काळ शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी महेश काळे यांना गायन कलेत उत्कृष्ठरित्या घडवले. शौनक अभिषेकी यांचेही महेशला मार्गदर्शन लाभले.  शास्त्रीय संगीत शिक्षणाचा प्रवास त्यांनी इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतानाही केले.

सध्या देशात आणि विदेशात महेश काळे यांचे चाहते असून देश विदेशात त्यांचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असते. त्यांचा शिष्यवर्गही मोठा आहे. देशात इंजिनीयरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी संगीतातील डबल एम. एस. पदवी प्राप्त केली. कटय़ार काळजात घुसली या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

Related posts: