|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » माजी आमदाराच्या बेनामी मालमत्तेची होणार फेरचौकशी

माजी आमदाराच्या बेनामी मालमत्तेची होणार फेरचौकशी 

प्रतिनिधी / बेळगाव

माजी आमदार अभय पाटील यांनी दोनवेळा आमदार असताना जमविलेली बेनामी मालमत्ता आणि त्यावरून दाखल करण्यात आलेल्या न्यायालयातील खासगी तक्रारीवर चौकशी होऊ शकत नाही. हा लोकायुक्त विभागाचा दावा फेटाळून लावून लोकायुक्तांनी याप्रकरणी फेर चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा, असा आदेश चतुर्थ अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. शिवळ्ळी यांनी दिला आहे. यामुळे आता लोकायुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागणार आहे.

शिवप्रति÷ान हिंदुस्थान संघटनेचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. ही तक्रार दाखल झाल्यावर 8 जुलै 2014 रोजी न्यायालयाने हा आदेश लोकायुक्तांना दिला होता. 2004 ते 2013 या काळात अभय पाटील यांच्या मालमत्तांमध्ये झपाटय़ाने झालेली वाढ आणि त्या संदर्भात होत असलेले आरोप यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र याच संदर्भात अभय पाटील यांच्यावर आणखी एक तक्रार आहे. शिवाय ते सध्या आमदार पदावर नाहीत, असे कारण पुढे करून लोकायुक्तांनी चौकशी होऊ शकत नाही, अशी भूमिका मांडली होती.

या भूमिकेनंतर न्यायालयीन प्रक्रिया रद्द ठरली होती. तक्रारदार किरण गावडे यांनी पुन्हा उच्च न्यायालयापर्यंत धाव घेवून ही तक्रार पुन्हा दाखल करून घेण्यासाठी विनंती अर्ज सादर केला होता. उच्च न्यायालयाने पुन्हा तक्रार करून घेण्याचे आदेश दिल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये तक्रार दाखल करून जानेवारी 2017 मध्ये तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या संदर्भातील पुढील प्रक्रिया लोकायुक्त पोलीस विभागाच्या चौकशीवर अवलंबून असल्यामुळे लोकायुक्त खात्याने मांडलेली भूमिका फेटाळून लावण्यात आली आहे.

अभय पाटील हे 2004 ते 2008 या काळात बागेवाडी मतदारसंघाचे आमदार होते. 2008 ते 2013 या काळात बेळगाव दक्षिणचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दोन्ही निवडणुकांना त्यांनी सादर केलेल्या मालमत्तांचे विवरण पाहता लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर त्यामध्ये कमालीची वाढ झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही मालमत्ता स्वतःच्या तसेच नातलगांच्या नावे जमविण्यात आली असून याची योग्य ती चौकशी करावी, ही मालमत्ता बेनामी असल्याचा तसेच बेकायदेशीररित्या जमविल्याचा संशय असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार किरण गावडे यांनी न्यायालयासमोर केली आहे.

फेरचौकशीचे आदेश दिल्याने तक्रारदारांना दिलासा

आमदार पदावर असताना जमविलेल्या मालमत्तेबद्दल माजी आमदार झाल्यावर चौकशी करणे योग्य नाही. या संदर्भात लोकायुक्तांनी मांडलेली भूमिका पुन्हा विचारात घ्यावी, अशी विनंती तक्रारदारांनी न्यायालयासमोर केली होती. त्यावर पुनर्विचार होवून लोकायुक्तांनाच फेरचौकशीचे आदेश देण्यात आल्याने तक्रारदारांना दिलासा मिळाला आहे. आता लोकायुक्त पोलीस विभागाकडून चौकशी करून अहवाल सादर होणार असून त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. तक्रारदारांच्यावतीने ऍड. विवेक कुलकर्णी काम पाहत आहेत.

लोकायुक्त पोलीस विभागाने न्यायालयाच्या 8 जुलै 2014 च्या आदेशाचा संदर्भ घ्यावा, या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Related posts: