|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आमच्याकडून केवळ कर वसूल करणार काय?

आमच्याकडून केवळ कर वसूल करणार काय? 

औद्योगिक क्षेत्राकडून दरवषी कोटय़वधी रुपये कर जमा होतो. मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. यामुळे उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून आमचा करासाठीच तुम्ही उपयोग करता काय? असा संतप्त सवाल उद्योजकांनी महापौर संज्योत बांदेकर आणि जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केला आहे.

उद्यमबाग येथील वसाहतींमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. रस्ते, गटारी, पथदीप, पाणी या समस्यांनी उद्योजक अक्षरश: कंटाळले आहेत. या परिसरातील समस्या सोडवा म्हणून अनेकवेळा निवेदने देण्यात आली. याचबरोबर बैठकाही घेण्यात आल्या. तरी देखील अजूनही येथील समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आता कोणाकडे तक्रार करू, असा सवाल करण्यात आला. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळे वाहने चालविणे कसरतीचे ठरत आहे. कोणताही माल आणण्यासाठी किंवा नेण्यासाठी वाहनांचा वापर करावा लागतो. यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. या वर्दळीमुळे सर्वत्र चिखल झाला आहे. रस्त्यावरील सर्व पथदीप बंद आहेत. त्यांची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नाही. गटारी आहेत पण त्यांची स्वच्छताच करण्यात येत नाही. डेनेजची समस्याही गंभीर बनली आहे. कचराकुंडय़ा नाहीत त्यामुळे कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न साऱयांनाच सतावत आहे.

महत्त्वाचे म्हणजे पिण्यासाठी या परिसरात आर. ओ. प्लॅंट नाही. त्यामुळे दूषित पाणीच प्यावे लागत आहे. याचबरोबर मुताऱयांची अवस्थाही दयनीय झाली आहे. त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या सर्व समस्यांमुळे उद्योजक त्रस्त झाले असून तातडीने समस्या सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मुख्य रस्त्यावर काही महिन्यातच खड्डे

तिसरा रेल्वे गेट ते पिरनवाडीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण झाले. या कामाला केवळ 8 ते 9 महिने झाले आहेत. मात्र आता या मुख्य रस्त्यावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तेव्हा संबंधित कंत्राटदारावर व अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. या रस्त्यावर रहदारी पोलिसांची नेमणूक केली जात नाही, त्यामुळे बऱयाचवेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर लहान-मोठे अपघात घडत आहेत. तेव्हा त्याचाही गांभीर्याने विचार करावा व रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

महापौर संज्योत बांदेकर यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक आयुक्त कार्यालयात जावून जिल्हाधिकारी एन. जयराम यांनाही निवेदन देण्यात आले. बेळगाव जिल्हा स्मॉलस्केल इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष उमेश शर्मा, उपाध्यक्ष रोहण जुवळी, श्रीधर उप्पीन, नितीन लांडगे, बी. एस. मंजुनाथ, महादेव चौगुले, रविंद्र बडाची, मोहन बांडगी, अशोक कोली, संजय शिंदे, पी. आर. कदम यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

 

Related posts: