|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आत्तेभावाचा खून करणाऱयाला जन्मठेप

आत्तेभावाचा खून करणाऱयाला जन्मठेप 

बेळगाव / प्रतिनिधी

आत्याच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकला होता. त्यानंतर आरोपीने खून झालेल्या व्यक्तीच्या घरी जावून तुमच्या मुलाला ठार मारले आहे, असेही सांगितले होते. या खून खटल्याची सुनावणी 11 वे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालायात होऊन आरोपीला जन्मठेप आणि 2 हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा न्यायाधीश मरूळ सिद्धराध्या यांनी ठोठावली आहे.

फकिराप्पा रूद्राप्पा बागडी (वय 23) रा. 5 वा क्रॉस रुक्मिणीनगर, असे आरोपीचे नाव आहे. त्याने नागाप्पा यल्लाप्पा परसन्नावर (वय 32) याचा दि. 25 सप्टेंबर 2015 रोजी खून केला होता. मयत नागाप्पा याने आरोपीचा मोबाईल चोरून विक्री केल्याच्या कारणातून ही खूनाची घटना घडली होती. आरोपी फकिराप्पा याच्या आत्याचा नागाप्पा हा मुलगा होता. तो रहायला फकिराप्पा याच्याच घरी होता.

मात्र मयत नागाप्पा यांनी फकिराप्पाचा मोबाईल चोरून विकला होता. यामुळे फकिराप्पाने नागाप्पाला घरी येऊ नकोस, असे सांगितले होते. तरीदेखील एक दिवस नागाप्पा हा फकिराप्पा घरी नसल्याचे पाहून घरात झोपला होता. त्यावेळी बाहेरून आलेल्या फकिराप्पाला नागाप्पा झोपल्याचे दिसले. रागाने त्याने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यात नागाप्पाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याने रस्त्यावर फेकून दिला होता.

या खूनानंतर फकिराप्पा हा नागाप्पाच्या घरी जावून तुमच्या मुलाचा मी खून केला आहे, असे सांगितले. त्यानंतर फकिराप्पाच्या विरोधात माळमारुती पोलीस स्थानकात भा.दं.वि. 302 कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली होती. या खटल्यात फकिराप्पा दोषी आढळला असून त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून शैलजा पाटील यांनी काम पाहिले.

रागाने खून केल्याची कबुली दिल्याने शिक्षा

मयत नागाप्पा याचा फकिराप्पा याला इतका राग आला होता की, खून केल्यानंतर त्याने चक्क नागाप्पाच्या घरी जावून तुमच्या मुलाचा खून केल्याचे सांगितले. या एकाच कबुलीमुळे त्याला जन्मठेपेसारखी कठीण शिक्षा झाली आहे. प्रत्यक्षदर्शी पुरावा नसला तरी आरोपीनेच कबुल केल्यामुळे तसेच तेथील परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्याला न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली आहे.

Related posts: