|Monday, October 15, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » धर्माचे राजकारण, राजकारण्यांचा धर्म!

धर्माचे राजकारण, राजकारण्यांचा धर्म! 

राजकीय नेत्यांप्रमाणेच धर्मगुरुही मैदानात उतरले आहेत. तोडफोडीची भाषा करण्यापेक्षा जोडण्याची भाषा करण्याची अपेक्षा आहे. भाजपला रोखण्यासाठी वीरशैव-लिंगायत समाजामध्ये बुद्धिभेद करण्यात येत आहे. एकीकडे कर्नाटकात मध्यावधी निवडणूक होणार, अशी चर्चा सुरू झाली असतानाच भाजपच्या व्होट बँकेवर डोळा ठेवून सिद्धरामय्या यांनी धर्मवाद कसा वाढेल याची काळजी घेतली आहे.

     

लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यासाठी कर्नाटकात आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुविरक्त, लिंगायत आणि वीरशैव हा जुना वाद नव्याने उफाळला आहे. लिंगायत धर्मच वेगळा आणि वीरशैव वेगळा या चर्चेत आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाग घेत नव्या वादाला तोंड फोडले आहे. निश्चितच यामागे राजकीय तंत्र अडकले आहे. उत्तर कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समाजाचा कल भाजपकडे आहे.

गेल्या अनेक निवडणुकात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच जर तुम्ही सारे एकत्र आलात तर स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी केंद्राकडे शिफारस करू असे सिद्धरामय्या यांनी धारवाड येथे जाहीर केले आहे. मुरुघामठात सत्कार झाला त्यावेळी मुख्यमत्र्यांनी स्वतंत्र धर्माविषयी आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला विरोध केला जात आहे तर दुसरीकडे त्यांच्या भूमिकेचे स्वागतही होत आहे. वीरशैव आणि लिंगायत असा भेद वाढवून समाज फोडण्याच्या या कुतंत्रामागे राजकीय महत्त्वाकांक्षा अडकलेली आहे. वीरशैव-लिंगायत एकच आहेत या आजवरच्या समजाला सुरुंग लावून समाजमन कलुषित करण्यात राजकीय नेते आघाडीवर आहेत.

देशभरातील वीरशैव-लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱया अखिल भारतीय वीरशैव महासभेनेही सुरुवातीपासूनच अशा प्रयत्नांना विरोध केला आहे. गुरु-विरक्तांमधील वाद संपवून समाज एकसंध ठेवण्यासाठीच महासभेचे प्रयत्न आहेत. वीरशैव-लिंगायत हे एकच आहेत, अशी भूमिका महासभेचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांनी मांडली आहे. जगद्गुरु मातेमहादेवी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. बाराव्या शतकात सामाजिक समानतेची बीजे रूजविणाऱया बसवेश्वरांच्या नावे हे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर वीरशैव आणि लिंगायत हे एकच धर्म दर्शविणारे दोन शब्द आहेत. बसवेश्वरांनी आपल्या वचन साहित्यामध्ये लिंगायतचा उल्लेख केला नाही.

बसवेश्वरांच्या समकालीन शरणांच्या वचन साहित्यात वीरशैवचा उल्लेख आहे. महात्मा बसवेश्वरांच्या नावे धर्मांत फूट पाडणे योग्य नाही असे श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्यांनी सांगितले आहे. रंभापुरी आणि काशी जगद्गुरुंनीही या प्रयत्नांना विरोध केला आहे. तरीही गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपकडे वळलेल्या वीरशैव-लिंगायत मतांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी या वादात उडी घेतली आहे. निवडणुका जवळ आल्या की, धर्माचा राजकारणासाठी वापर करणे हाच आपला धर्म समजणाऱया राजकीय नेत्यांमुळे हा जुना वाद सध्या पुन्हा चिघळला आहे.

दक्षिणेत जसा वक्कलिग समाज प्रभावी आहे, तसेच उत्तर कर्नाटकात वीरशैव-लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. अखिल भारतीय वीरशैव महासभेची स्थापना करणारे हानगल कुमार स्वामीजी विरक्त परंपरेतील गुरु होते. समाज घडविण्यासाठी त्यांना एक दृष्टी होती. आजवर महासभेची जितकी अधिवेशने झाली, त्या सर्व अधिवेशनात गुरु-विरक्त हा वाद झालेला आहे. हा वाद जुनाच आहे. आजवर पंच पीठाधिश्वर विरक्त मठाधीशांबरोबर समान आसनावर बसत नव्हते. त्यांना बसण्यासाठी उंच आसन लागत होते. आता परिस्थिती बदलली आहे. गुरु-विरक्त एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. काळानुरूप बदल घडत असतानाच अचानक जुन्या वादाने नव्या स्वरूपात उचल खाल्ली आहे. महात्मा बसवेश्वर हेच धर्म संस्थापक, वचन साहित्य हेच धर्मग्रंथ आहे. इतर धर्माप्रमाणेच हा धर्म स्वतंत्र आहे. त्याला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळायलाच हवी. या भूमिकेवर जगद्गुरु माते महादेवी ठाम आहेत. काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींना माते महादेवी यांचीही भूमिका मान्य नाही. लिंगायत हा शब्दच मुळात धर्मवाचक नाही. तो एक दीक्षा-संस्कार आहे. पंचाचार्य हेच धर्म संस्थापक आहेत. महात्मा बसवेश्वर हे धर्म सुधारक होते. वीरशैव-लिंगायत या दोन्ही शब्दांचा उल्लेख असेल तरच अशा स्वतंत्र धर्मासाठी होणाऱया प्रयत्नांना आपला पाठिंबा असणार आहे असे सांगितले आहेत.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही या वादात उडी घेतली आहे. वीरशैव-लिंगायत दोन्ही एकच आहेत. स्वतंत्र धर्मासाठी अखिल भारतीय वीरशैव महासभा जो निर्णय घेईल तो अंतिम असेल असे येडिंनी सांगितले आहे. मुळात माते महादेवी यांना महासभेचे अस्तित्वच मान्य नाही. शामनूर शिवशंकरप्पा, ईश्वर खंडे यांना बसव तत्त्व काय कळणार आहे असा प्रश्न उपस्थित करून एका कन्नड दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत महासभेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. वीरशैव-लिंगायतसंबंधी सध्या सुरू असलेल्या परस्पर विरोधी चर्चेमुळे समाजात गोंधळ निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांप्रमाणेच धर्मगुरुही मैदानात उतरले आहेत. तोडफोडीची भाषा करण्यापेक्षा जोडण्याची भाषा करण्याची अपेक्षा आहे.

भाजपला रोखण्यासाठी वीरशैव-लिंगायत समाजामध्ये बुद्धिभेद करण्यात येत आहे. एकीकडे कर्नाटकात मध्यावधी निवडणूक होणार, अशी चर्चा सुरू झाली असतानाच भाजपच्या व्होट बँकेवर डोळा ठेवून सिद्धरामय्या यांनी धर्मवाद कसा वाढेल याची काळजी घेतली आहे. सामाजिक समानता, बंधुत्व, कर्मवाद शिकविणाऱया वीरशैव-लिंगायत धर्म तोडण्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी कर्नाटक एक राजकीय प्रयोगशाळा ठरली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केलेले प्रयोग कर्नाटकात यशस्वी करता येतील का, याचा विचार भाजप नेते करीत आहेत. आता काँग्रेसनेही असाच प्रयोग सुरू केला आहे. दोन पक्षांच्या ‘धर्मकारणा’चे फलित काय असणार आहे याचे उत्तर प्रयोग पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे.

Related posts: