|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बहारदार गायकीला रसिकांची भरभरून दाद

बहारदार गायकीला रसिकांची भरभरून दाद 

वास्को :

श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या पूर्वसंध्येला काल गुरूवारी प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम दामोदर मंदिरासमोरील भव्य मंडपात झाला. रसिकांनी या संगीत मैफलीला भरभरून दाद दिली. मोठय़ा संख्येने रसिक या संगीत मैफलीला उपस्थित होते.

पं. जितेंद्र अभिषेकींचा सूर आणि वारसा समर्थपणे चालवणाऱया गायक महेश काळे यांनी सुरवातीला उपस्थित जनसागराला उद्धेशून तुम्ही मला ऐकण्यासाठी आला नसून पं. जितेंद्र अभिषेकीबुवांच्या शिष्याचे गायन ऐकण्यासाठी आला आहात असे नम्रपणे सांगून त्यांनी एकापरीने आपल्या गुरूला वंदना दिली. सुरवातीला त्यांनी महादेव, देव महेश्वरा….. ही भूप रागातील बंदीशी पेश केली व तद्नंतर ‘सूर निरागस हो… ही रचना गाऊन आपल्याबरोबर उपस्थित श्रोत्यांनाही मोरया मोरया…….. गायला लावले. त्यामुळे मैफलीत भक्तीचे रंग भरले. घेई छंद मकरंद….. व देवा घरचे ज्ञात कुणाला हे नाटय़गीतही आपल्य़ा भारदस्त आवाजात पेश करून उपस्थितांना रिझविले. त्यानंतर कट्टय़ार काळजात घुसली या चित्रपटातील ‘मन मंदिरा तेजाने, उजळून घेई….. हे गाणे गाऊन रसिकांची दाद मिळविली.

 बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल….., संतांचीया पायी प्रेमाचा सुकाळ……, सुखाचे जे सुख चंद्रभागे तीरी….., आम्हा न कळे ज्ञान…., या रे नाचू प्रेमानंदे….., अवघे गरजे पंढरपूर… , कानडा राजा पंढरीचा….. या अभंगातील एक एक कडवे सलगपणे सादर करण्याची नजाकत त्यांनी सुरेखपणे पेश केली. अबीर गुलाल हा अभंग आळवून त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. सुमधूर आणि तेवढय़ाच भारदस्त गायकीने त्यांना श्रोत्यांना जिंकले. काळेंनी रसिक श्रोत्यांनाही आपल्या सूरात सूर मिसळण्यास भाग पाडले. आपल्या गीताला साथ देण्याची त्यांनी केलेल्या सुचनेची श्रोत्यांनी पालन केले आणि सूरात सूर मिसळण्याचा आनंद घेतला. ऑर्गनवर राया कोरगांवकर, हार्मोनियमवर महेश धामस्कर, तबला दयानिधेश कोसंबे, पखवाज दत्तराज शेटय़े, ताळ राहुल खांडोळकर यांनी साथसंगत केली. निवेदनाची जबाबदारी डॉ. अजय वैद्य यांच्यावर होती. त्यांच्या खास शैलीने त्यांना उपस्थितांवर छाप पाडली.

प्रारंभी पुरस्कर्ते श्रीपाद शेटय़े यांनी गायक महेश काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर संजय शेटय़े यांनी त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. त्यानंतर सप्ताह समितीचे अध्यक्ष अनंत नाईक यांनी संगीत साथ करणाऱया सर्व कलाकारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सरचिटणीस विनायक घोंगे यांनी केले.