|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापौरांनी घेतली कामकाजाची माहिती

महापौरांनी घेतली कामकाजाची माहिती 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेतील विविध विभागातील कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषत: लेखा विभागाकडून बिले अदा करण्यास विलंब होत आहे. इमारत बांधकाम परवाना देण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यामुळे महापौर संज्योत बांदेकर यांनी शुक्रवारी लेखा, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागात भेट देऊन समस्यांची माहिती जाणून घेतली. नागरिकांची कामे विनाविलंब करण्याचा आदेश दिला.

इमारत बांधकाम परवानगीकरिता नागरिकांना महापालिकेच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. सात दिवसात इमारत बांधकाम परवानगी देण्याचा आदेश महापालिकेला नगरविकास खात्याने दिला आहे. पण याची अंमलबजावणी करण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तसेच लेखा विभागाकडून बिले वेळेत अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. महापालिकेच्यावतीने विविध योजनेंतर्गत धनादेश देण्यास विलंब होत असून काही कर्मचाऱयांच्या रुग्णालयाची बिले तसेच निवृत्तीवेतनाच्या फाईल्स पुढे सरकत नसल्याबाबत महापौरांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामुळे महापौरांनी लेखा, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागात भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

 लेखा विभागामध्ये कर्मचारी अपुरे असल्याची माहिती लेखा अधिकारी रामाप्पा हट्टी यांनी दिली, तसेच लेखा विभागाच्या कार्यालयासाठी जागा अपुरी असल्याने कार्यालयाचा विस्तार करण्यासाठी कर्मचारी आणि जागेची आवश्यकता असल्याची माहिती महापौरांना देण्यात आली. इमारत बांधकाम परवानगी देण्यास विलंब होण्याची कारणे विचारण्यात आली. यासाठी अपुरे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. तिन्ही विभागांची माहिती घेऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडचणी होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना देऊन अडलेल्या फाईल विनाविलंब निकालात काढण्याचा आदेश महापौरांनी दिला. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका माया कडोलकर, नगरसेवक राकेश पलंगे आदी उपस्थित होते.

Related posts: