|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामस्थांसमोर अधिकारी ठरले निरुत्तर

ग्रामस्थांसमोर अधिकारी ठरले निरुत्तर 

ओटवणे केबल चर खोदाईच्या निकृष्ट दर्जाच्या कामासह या चरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांसह जायबंदी झाले, त्यांना योग्य भरपाई देण्यासाठी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली दाणोली पंचक्रोशीवासीयांनी मंगळवारी दुपारी दूरसंचारचे जिल्हा महाप्रबंधक मारुती ठक्कनवार यांना घेराव घातला. यावेळी संदीप गावडे यांनी बीएसएनएलच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढीत लेखी आश्वासनाशिवाय कार्यालयातून न हलण्याची आक्रमक भूमिका घेतली.

 एक तासाच्या चर्चेनंतर ठक्कनवार यांनी दाणोलीसह विलवडे भागातील केबलचे चर एक महिन्यात अंदाजपत्रकाप्रमाणे बुजविण्यासह या चरामुळे शेतकऱयांचे झालेले नुकसान तसेच चरात पडून जायबंदी झालेल्यांना भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर या वादावर पडदा पडला. मात्र तत्पूर्वी चर खोदाईच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सामोऱया जाव्या लागणाऱया समस्यांचा पाढाच संतप्त दाणोली पंचक्रोशीवासीयांनी वाचला. ठक्कनवार यांच्यासह व्ही. एस. वेदपाठक, एस. डी. वजराठकर, मदन सोनावणे, दिनेश ढुमणे या अधिकाऱयांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

यावेळी सौरभ गावडे यांनी या केबल खोदाईच्या कामात अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करीत अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालत असल्यामुळेच दाणोली पंचक्रोशीवासीयांवर ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले. प्रमोद परब म्हणाले, भात शेतीतून चर खोदल्यामुळे या केबलच्या मार्गातील शेती पडिक ठेवावी लागली. यात शेतकऱयांचे नुकसान झाले असून परिसरात वावरणे धोक्याचे बनले असल्याचेही ते म्हणाले. विनायक सावंत म्हणाले, दाणोली पंचक्रोशीतले रस्ते अरुंद असून या रस्त्यालगत केबल खोदाईचे काम केल्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे सातत्याने या भागात लहान-मोठे अपघात होत आहेत.

संदीप गावडे यांनी केबल चर खोदकाम व बुजविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगून एकाही गावातील काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसल्याचा दावा केला. यावरही अधिकारी निरुत्तर झाले. कामाच्या अनियमिततेवरच गावडे यांनी बोट ठेवल्याने अधिकाऱयांवर सारवासारव करण्यापलिकडे कोणताही पर्याय नव्हता. यावेळी केसरी फणसवडे, देवसू, पारपोली, ओवळिये, सातुळी या गावातील अजित परब, प्रणय गावडे, संपत परब, रुपेश सावंत, अंकित मनिष परब, एकनाथ गावडे, विश्वास नाईक, विनायक सावंत, सौरभ गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान मंगळवारी सकाळी विलवडे येथेही केबल खोदाईचा निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत त्याच ठिकाणी आलेले बीएसएनएलचे सावंतवाडी उपमंडळ अधिकारी गिरीष जाधव, अनिल गोडसे यांची संदीप गावडेंसह विलवडे ग्रामस्थांनी कानउघडणी केली. या अधिकाऱयांवर सर्वांनीच प्रश्नांचा भडीमार करून धारेवर धरले. यावेळी विलवडे उपसरपंच एकनाथ दळवी, उपसरपंच बाबू दळवी, निल सावंत, रामचंद्र दळवी, सागर दळवी, रमाकांत दळवी आदींसह विलवडे ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: