|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जुनी कात टाकून एसटीला आधुनिकतेची आस

जुनी कात टाकून एसटीला आधुनिकतेची आस 

कणकवली एसटी महामंडळालाही आता आधुनिकतेची आस लागली आहे. काही महिन्यांपूर्वीच आधुनिक कॉल सेंटर महामंडळाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता तर येत्या दोन महिन्यातच हे कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असून त्यासाठी महामंडळ वर्षाला तब्बल एक कोटी रुपये मोजणार आहे. एसटीच्या आधुनिक कॉल सेंटरमुळे आता राज्यातील कुठल्याही भागातील प्रवाशांना एकत्रित आपली तक्रार नोंदविता येणार आहे. 

 आधुनिक कॉल सेंटरची उभारणी झाल्यावर एसटी प्रवाशांना वक्तशीरपणाचा अभाव दाखविणाऱया कर्मचाऱयांबाबत, बसची खराब स्थिती, कोलमडलेले वेळापत्रक, अयोग्य तिकीट देणे, सुट्टे पैसे परत न देणे, बसस्थानकावरील गैरसोय, उपहार गृहातील अस्वच्छता, एसटी कर्मचाऱयांकडून होणारी गैरवर्तणूक आदींबाबत तक्रार नोंदविता येणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

यापूर्वी प्रवाशांच्या सूचनांची तातडीने दखल घेण्यासाठी एसटी महामंडळाने कॉल सेंटर सुरू केले होते. पण त्याला आधुनिकतेची जोड न मिळाल्याने 2010 मध्ये सुरू करण्यात आलेले हे कॉल सेंटर बंदच होते. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि वाढत जाणारा अनागोंदी कारभार यामुळे आता तातडीने आधुनिक कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. हे कॉल सेंटर येत्या दोन महिन्यातच सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाने 2010 मध्ये प्रथम कॉल सेंटर सुरू केले होते. तेव्हा 1800221250 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यावेळी या कॉल सेंटरमध्ये जादा कर्मचाऱयांची नियुक्ती केली नव्हती. फक्त तीनच कर्मचारी नियुक्त केले होते. प्रवाशांकडून कॉल सेंटरवर तक्रारी घेताना माहिती नोंदवली जात होती. पण तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने त्याची नोंद एका रजिस्टरमध्येच नोंदविली जात होती. कारण तिथे तंत्रज्ञानाचा अभाव आणि प्रशिक्षित कर्मचाऱयांची कमरता होती. मात्र, आता नवे कॉल सेंटर आधुनिक प्रणालीनुसारच चालेल.

एसटी महामंडळाचे विद्यमान संचालक तथा उपाध्यक्ष संजय खंदारे यांनी प्रथम कॉल सेंटरचे आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. प्रवाशांना फेऱयांचे वेळापत्रक तसेच जादा बसेस, आरक्षण, तक्रारी, सूचना आणि विविध योजनांची माहिती या कॉल सेंटरमध्ये उपलब्ध होणार आहे. मात्र, गेली दोन वर्षे आधुनिक कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय प्रलंबित होता. आता आधुनिक कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी साय फ्युचर इंडिया प्रा. लि.शी करार करून दोन महिन्यात कॉल सेंटर सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

कॉल सेंटरमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातील प्रवाशांना आपली तक्रार नोंदविता येणार आहे. मात्र, कॉल सेंटरचा नियंत्रण कक्ष मुंबईत राहणार आहे. तर एसटीचा आधीचा कॉल सेंटर क्रमांकच हा नवीन कॉल सेंटरचाही राहणार आहे. हे कॉल सेंटर 24 तास सुरू राहणार आहे. फ्युचर इंडिया प्रा. लि. या कंपनीला कॉल सेंटर सुरू झाल्यापासूनच वर्षाचे कंत्राट देण्यात येणार असून यासाठी एसटी महामंडळ तब्बल वर्षाला एक कोटी खर्च करणार आहे. कंपनी कॉल सेंटरसाठी सुमारे वीस कर्मचारी कार्यान्वित ठेवणार आहे. त्यांना दोन महिन्यांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

जुनी कात टाकून आधुनिकतेची आस

शिवसेनेचे दिवाकर रावते परिवहनमंत्री झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत एसटी प्रगतीकडे जात असल्याचे अनुभवास येत आहे. त्याचे कारण एसटीने जुनी कात टाकून आधुनिकतेची धरलेली आस. यापूर्वी महामंडळाने आपल्या ताफ्यात शिवशाहीसारखी आधुनिक गाडी दाखल केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय चांगलाच असल्याचे मत प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

Related posts: