|Monday, August 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नूतन अभियंत्यांच्या कार्यभार सोहळय़ात विघ्न

नूतन अभियंत्यांच्या कार्यभार सोहळय़ात विघ्न 

प्रतिनिधी/ बेळगाव

पाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते प्रसन्नमूर्ती यांच्याकडील कार्यभार विजापूरचे कार्यकारी अभियंते अशोक मडय़ाळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. नवनिर्वाचित कार्यकारी अभियंते सी. एन. करिअप्पा यांनी अशोक मडय़ाळ यांच्याकडून मंगळवारी कार्यभार घेतला. मात्र कार्यभार सोपविताना सीटीसीवर माहिती आणि जमा-खर्चाची माहिती स्पष्ट नसल्याचे अशोक मडय़ाळ यांच्या निदर्शनास आल्याने कार्यभार सोपविण्यास तब्बल दीड तास विलंब झाला.

पाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अधिकारी प्रसन्नमूर्ती यांच्यासह कार्यालयातील सहा अधिकाऱयांच्या बदल्या एकाचवेळी झाल्या आहेत. मात्र अद्यापही काही अधिकारी रूजू झाले नाहीत. प्रसन्नमूर्ती यांची बदली म्हैसूर येथे झाली आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंते, साहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या हुबळी तसेच इतर ठिकाणी झाल्या आहेत. प्रसन्नमूर्ती यांना दि. 24 रोजी रिलिक्ह करण्यात आले होते. त्यांच्यापदी सी.एन.करिअप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण ते रूजू झाले नसल्यामुळे प्रसन्नमूर्ती यांच्याकडील कार्यभार विजापूर उपविभागाचे कार्यकारी अभियंते अशोक मडय़ाळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. 

सी. एन.करिअप्पा मंगळवारी रूजू झाले असून अशोक मडय़ाळ यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपविला. पण कार्यालयातील आवश्यक माहिती असलेल्या सीटीसीवर सह्या घेणे बंधनकारक आहे. पण सीटीसीमधील माहिती अपूर्ण असल्याचे अशोक मडय़ाळ यांच्या निदर्शनास आले. जमा-खर्चाची रक्कम नमूद करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे शिल्लक रकमेची नोंद नसल्याचे निदर्शनास आल्याने कार्यभार सोपविताना मडय़ाळ यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे याबाबतचा जाब कार्यालय अधीक्षकांना विचारला.

महिना अखेर असल्याने बँकेकडून चलन मिळण्यास विलंब झाला असल्याने व्यवस्थित माहिती नसल्याचे कार्यालय अधीक्षकांनी सांगितले.  कार्यभार सोपविण्यात येणार असल्याची माहिती देवूनही माहिती अपूर्ण का ठेवली असा मुद्दा उपस्थित केला. दिलेले कारण योग्य नसल्याचे सांगून अशोक मडय़ाळ यांनी अधीक्षकांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अशोक मडय़ाळ आणि सी.एन.करिअप्पा यांनी सर्व माहिती घेतली. नोंद वह्य़ाची पडताळणी केली. त्यानंतर कार्यभार देण्याची  प्रक्रिया पार पडली. पाणी पुरवठा मंडळाच्या कामकाजात सावळागोंधळ असल्याचा संशय आल्यानेच अशोक मडय़ाळ यांनी कार्यभार सोपविताना व्यवस्थित  माहिती घेतली असल्याचे निदर्शनास आले. पण ही सर्व माहिती घेण्यात आल्याने कार्यभार सोपविण्यास तब्बल दीड तास विलंब झाला.

कार्यभार सोपविताना तांत्रिक अभियंते अशोक शिरूर, साहाय्यक कार्यकारी अभियंते आय. जी. देवर, एस. आर. यळेबली, अशोक दोड्डलिंगण्णावर आदीसह अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी पुष्पगुच्छ देवून सी.एन.करिअप्पा यांना शुभेच्छा दिल्या.

Related posts: