|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » शेती..माती..अन् गणपती..!

शेती..माती..अन् गणपती..! 

सुकृत मोकाशी / पुणे :

शेती हाच मुख्य व्यवसाय…शेतीत काम करता-करताच मातीशी नाते जुळले….अन् या मातीशी एकरूप होताना त्यातून कधी गणरायाचे रूप साकारले ते कळलेच नाही…!

मिलिंद रासकर या शेतकरी-कलाकाराच्या हातांची ही किमया आहे. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून शेतीत काम करता करता मूर्ती बनविण्याचा छंद जोपासणाऱया रासकर यांनी गणपतीची विविध रूपे, ग्रामीण जीवनातील वस्तू साकारत आपल्या कलेचे विविध पैलू दाखवून दिले आहेत. आपल्या या छंदाविषयी ‘तरूण भारत’शी अधिक बोलताना ते म्हणाले, आमची शेती सोलापुरातील माळीनगर येथे असून, ती वडिलोपार्जित आहे. शेतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर आम्ही करत नाही. मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून शेतीमध्ये वडिलांना मदत करतो. शेतीमध्ये वडिलांना मदत करता करता मातीपासून मूर्ती बनविण्याची आवड निर्माण झाली. माझे कमर्शियल आर्टमध्ये तिसऱया वर्षापर्यंत शिक्षण झाले आहे. त्यातूनच गणपतीची विविध रूपे, ग्रामीण भागातील वस्तू बनविण्यातून आपली आवड जपली. यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण मी घेतले नाही. आवडीने हा छंद जोपासला, असे त्यांनी नमूद केले.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीची विविध रूपे त्यांनी टेराकोटा मातीपासून साकारली आहेत. यामध्ये गणपतीच्या लहान मूर्त्यांपासून ते मोठय़ा मूर्त्यांचा समावेश आहे. ‘सेल्फी काढताना’, ‘अकरा वाद्यांसोबत’, ‘लॅपटॉप वापरताना’, ‘विठ्ठलाच्या रूपात’, ‘कृष्णाच्या रूपात’ तसेच ‘रथामध्ये बसलेले गणेश’ अशा विविध रूपात गणेश साकारले आहेत. अशा हजारो गणपतीच्या मूर्त्या तयार केल्या असून, गणपती आपले आवडते दैवत आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. हे गणपती बनविताना कोणत्याही प्रकारचा साचा वापरलेला नाही. तसेच कोणाचीही मदत घेतलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टेराकोटा माती ही मुख्यतः राजस्थानमधून बाजारात येत असते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नसते. या मातीला पाच हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. बनवलेली मूर्ती आठ दिवस भट्टीत ठेवायची असते. त्यानंतर ती मूर्ती वाळून त्याच्यावर रंगकाम करावे लागते, असेही रासकर यांनी सांगितले.

उद्यापासून बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदर्शन

रासकर यांनी टेराकोटा मातापसून बनवलेल्या विविध रूपातील गणेशमूर्तीचे प्रदर्शन आजपासून  (गुरुवार) ते 6 ऑगस्टपर्यंत भरणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.