|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूणचे सुपूत्र हेमंत भागवत वायुसेना प्रशासन विभागप्रमुखपदी

चिपळूणचे सुपूत्र हेमंत भागवत वायुसेना प्रशासन विभागप्रमुखपदी 

एअर मार्शल भागवतांच्या भरारीचा अभिमान

अतिविशिष्ट, विशिष्ट सेवा पदकाने यापुर्वी गौरव

प्रतिनिधी /चिपळूण

अतिशिष्ट व विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांची भारतीय वायू सेनेच्या प्रशासकीय विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भागवत हे मुळचे रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथील आहेत. भागवत यांनी वायुदलात घेतलेल्या या भरारीने जिल्हावासीयांचा उर अभिमाने भरून आला आहे.

एअर मार्शल भागवत यांनी 1 ऑगस्ट 2017 रोजी नव्या पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी ते वायू सेनेच्या मुख्यालयात महासंचालक (वर्क अँड सेरेमोनीयल) पदावर कार्यरत होते. पॅराट्रुपींग मधील महत्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वायू सेना पदकाने त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच, वायुसेनेतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अतीविशिष्ट सेवा पदक व विशीष्ट सेवा पदाकानेही सन्मानित करण्यात आले आहे.

एअर मार्शल भागवत हे वायू सेनेच्या विविध ऑपरेशनल बेस मध्ये 7 वर्षांपर्यंत हवाई वाहतूक नियंत्रक अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वा त्यांनी नी पॅराशूट जंप इन्स्ट्रक्टर म्हणून 15 वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. आग्रा येथील पॅराट्रुप्स प्रशिक्षण केंद्राचे ते 5 वर्षांपर्यंत मुख्य प्रशिक्षक होते. आकाशगंगा स्काय डायव्हींग संघाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. अमेरीका, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि सियाचेल्स येथे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरा अभ्यासामध्ये सहभाग घेतला आहे.

भागवत यांनी वेलींगटन येथून संरक्षण सेवेतील पदवी मिळवली आहे. हैदराबाद येथून त्यांनी हायर एअर कमांड विषयक अभ्यास केला तर सिकंदराबाद येथून संरक्षण व्यवस्थापकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. मद्रास विद्यापीठातून त्यांनी सैनिकी डावपेच विषयक अभ्यासक्रमात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले तर उस्मानिया विद्यापीठातून एमफील पूर्ण केले आहे. जिल्हय़ाच्या सुपुत्राने वायू दलात घेतलेल्या या भरारीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिमान व्यक्त होत आहे.

Related posts: