|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळपईतील विश्वजित राणेंची मक्तेदारी मोडीत काढा

वाळपईतील विश्वजित राणेंची मक्तेदारी मोडीत काढा 

प्रतिनिधी/ वाळपई

वाळपईतील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केलेले रॉय नाईक यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विश्वजित राणेंची मक्तेदारी मोडीत काढा, असे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक चेल्लाकुमार यांनी केले. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावल्याने  काँग्रेस पक्षाची यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

यावेळी सर्वप्रथम वाळपईतील श्रद्धास्थान हनुमान मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेतले व मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले.

आपला उमेदवारी अर्ज त्यांनी निवडणूक अधिकारी प्रवीण परब यांच्याकडे सादर केला. नंतर गोवा प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक चेल्लाकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना वाळपईतील भाजपाचे उमेदवार आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यावर टीका केली. वाळपईतील मतदारांना वेगवेगळय़ा प्रकारच्या धमक्याचा अक्षरश: कंटाळा आला आहे.  यामुळे यंदा मतदार विश्वजित यांचा मोठय़ा फरकाने पराभव करणार आहे. राजकीय क्षेत्रात कोणत्याही पक्षात त्यांना स्थिरता लाभलेली नाही. शेवटी पदाच्या लालसेपोटी त्यांना अचानक भाजपाचे भक्त कसे बनले हे सर्वांना न सुटणारे कोडे आहे, असे चेल्लाकुमार यांनी सांगितले.

वाळपई मतदारसंघात आजही मोठय़ाप्रमाणात विकासाची गरज आहे ज्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे. याबाबत बोलताना वाळपईतील सरकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन काँग्रेस पक्ष सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री रवी नाईक यांच्याहस्ते करण्यात आले मात्र. त्यानंतर या इमारतीसाठी अजिबात लक्ष देण्यात आले नाही हाच वाळपई मतदारसंघाचा विकास आहे का? असा सवाल चेल्लाकुमार यांनी केला आहे. वाळपई मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे व येणाऱया निवडणुकीत रॉय नाईक याचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. वाळपईतील उमेदवारी जाहीर करण्यासाठी एवढा उशीर का? या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना चेल्लाकुमार यांनी सांगितले की आजवर काँग्रेस पक्ष उमेदवारी जाहीर करताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही असा  आरोप करण्यात येत असल्याने यावेळी खबरदारी म्हणून वाळपईतील जनतेला विश्वासात घेऊनच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार विश्वजीतने गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येण्याचा मान मिळविला होता. मात्र कोणालाही विश्वासात न घेता आमदारकीचा राजीनामा दिला यामुळे मतदारांची फसवणूक केली आहे याचा वचपा मतदार नक्कीच काढणार आहे असे चेल्लाकुमार म्हणाले.

मनोहर पर्रीकर खोटे बोलतात

गोव्यातील जनतेचा अनादर करून राज्यात सत्तेवर आलेले मनोहर पर्रीकर सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले आहे अशी टीका चेल्लाकुमार यांनी केली.  मुख्यमंत्री पर्रीकर विधानसभेत सुद्धा खोटे बोलत आहेत. खाण प्रकरणी चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक.

गोव्यातील दोन पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात काँग्रेसच्या दोन संभाव्य उमेदवारांना मनोहर पर्रीकर सरकारने धमकावून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप शांताराम नाईक यांनी केला आहे. अन्यथा सदर दोन्ही उमेदवार मागे का सरले याचे उत्तर मनोहर पर्रीकर यांनी देण्याची गरज आहे. वाळपईत रॉय नाईक हे विश्वजित राणे यांचा पराभव करून निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

वाळपईतील विकासाकडे दुर्लक्ष : रवी नाईक

वाळपईतील विकासासंबंधी मोठा गाजावाजा करणाऱया राणे यांना अनेक गावात रस्त्याच्या  समस्या सोडविणे जमले नाही. अनेक गावांत आज रस्ता नाही. अशा प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन दिले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते व केपे मतदारसंघाचे आमदार बाबू कवळेकर, गोवा प्रदेश महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सेवा दलाच्या महिला अध्यक्षा सावित्री कवळेकर, गोवा प्रदेश महिला सरचिटणीस ऐश्वर्या साळगावकर, वाळपई गट काँग्रेस अध्यक्ष आशिष काणेकर, महिला अध्यक्ष सौ. रोशन देसाई, पक्षाच्या नेत्या स्वाती केरकर आदींसह असंख्य कार्यकर्ते होते.

Related posts: