|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि. प.च्या 22 शाळा बंद

जि. प.च्या 22 शाळा बंद 

सावंतवाडी तालुक्यातील स्थिती : विद्यार्थ्यांना लगतच्या शाळेत वर्ग करणार

प्रतिनिधी/ सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील 22 प्राथमिक शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. शासन निर्णयानुसार या शाळा बंद करुन या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेत वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पं. स. सभापती रवींद्र मडगावकर यांनी मंगळवारी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या शाळेतील विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणी वर्ग करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे शक्य आहे का, याची पाहणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रभारी गटविकास अधिकारी विनायक पाटील, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना बोडके, विषयतज्ञ सरिता गावडे, जि. प. माजी सदस्य पंढरी राऊळ, सांगेली उपसरपंच अभय किनळसकर, शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आदी उपस्थित होते.

तालुक्यात 0 ते 5 पटसंख्या असलेल्या 22 शाळा तालुक्यात आहेत. या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय झाला आहे. यामध्ये निगुडे नं 3, तिरोडा कोलाटवाडी, दाभील, पडवे धनगरवाडी, साटेली-देऊळवाडी, सातार्डा नं. 3, शेर्ले नं. 3, तळवडे नं. 3, बावळाट मुलांडा, कोलगाव डोंगरवाडी, चौकुळ बेरडकी, डिंगणे-धनगरवाडी, डोंगरपार, मळेवाड नं. 5, आरोंदा मानसी, नाणोस जाधववाडी, सातार्डा, सांगेली सनमटेंब आदी शाळांचा समावेश आहे.

मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न हवेत!

सध्या जि. प. प्राथमिक शाळामधील पटसंख्या घटत चालली आहे. तालुक्यातील गोवा हद्दीलगतच्या सातार्डा भागातील दोन शाळा बंद पडल्या आहेत. एकूण 214 शाळांपैकी 192 शाळा आता सुरू आहेत. इंग्रजी माध्यम शाळांकडे कल वाढल्याने जि. प. मराठी माध्यम शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मराठी शाळा वाचविण्यासाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या 22 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, त्या शाळांची परिस्थिती पाहून तेथील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत पाठविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, याची पाहणी करून निर्णय घेण्यात येईल, असे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सांगितले. डोंगराळ भागातील शाळा बंद झाल्यावर तेथील विद्यार्थ्यांना अन्य शाळांत जाण्याची सुविधा शाळा व्यवस्थापन समितीने करावी, असे सांगण्यात आले.