|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » थिएमला पराभवाचा धक्का

थिएमला पराभवाचा धक्का 

वृत्तसंस्था/ माँट्रियल

अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनने रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत दिवसातील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवताना तिसऱया मानांकित डॉमिनिक थिएमचे आव्हान संपुष्टात आणले.

सुमारे तीन तास रंगलेल्या या लढतीत श्वार्ट्झमनने निर्णायक सेटमध्ये 2-5 गेम्सची पिछाडी भरून काढत सलग पाच गेम्स जिंकत ही झुंज 6-4, 6-7 (7-9), 7-5 अशी जिंकली. या वर्षात श्वार्ट्झने 16 व्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटलाही पराभवाचा धक्का दिला होता तर फ्रेंच ग्रँडस्लॅममध्ये त्याने ज्योकोव्हिकला पाच सेट्सपर्यंत झुंजवले होते. थिएमवरील विजय हा त्याचा या मोसमातील सर्वात मोठा विजय आहे.

अन्य सामन्यात अमेरिकेच्या सॅम क्वेरीने फ्रान्सच्या व्हिन्सेंट मिलॉटचा 4-6, 7-6 (7-4), 7-5 असा पराभव केला. गेल्या आठवडय़ातही क्वेरीने त्याच्यावर विजय मिळविला होता. त्याची पुढील लढत फ्रान्सच्याच जो विल्फ्रेड त्सोंगाशी होईल. कॅनडाचा 18 वषीय उदयोन्मुख टेनिसपटू डेनिस शापोव्हॅलोव्हने ब्राझीलच्या रॉजेरिओ डुट्रा दा सिल्वावर 4-6, 7-6 (10-8), 6-4 अशी मात केली. त्याचा मुकाबला जुआन मार्टिन डेल पोट्रोशी होईल.

झेकच्या दहाव्या मानांकित टॉमस बर्डीचने बरगडीच्या दुखापतीमुळे पहिला सामना सुरू होण्याआधीच स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे त्याच्या जागी अमेरिकेच्या अर्नेस्टो एस्कोबेडोला संधी मिळाली. या संधीचा लाभ घेत त्याने निकोलोझ बॅसिलाश्विलीला 7-6 (7-4), 6-4 असा धक्का दिला. याशिवाय डेव्हिड गॉफिन, पाब्लो कॅरेनो बुस्टा, जॅक सॉक यांनीही विजय मिळवित आगेकूच केली.

Related posts: