|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दुर्लक्षित घटकांना हक्काचे स्थान मिळवून देण्याचे काम कौतुकास्पद

दुर्लक्षित घटकांना हक्काचे स्थान मिळवून देण्याचे काम कौतुकास्पद 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   दुर्लक्षित घटकांना समाजात हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सुरू असणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांनी हे कार्य सेवाभावी वृत्तीने सुरू ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जाणीव आणि मैत्रीण संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालय वाटप कार्यक्रम आणि विधी साक्षरता शिबीरप्रसंगी ते बोलत होते.

  मानवी तस्करीचे बळी, तृतीयपंथी, एचआयव्ही सहजीवन जगणारे बालके व महिला यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका यांनी दिलेल्या लक्ष्मीपुरी येथील दलाल मार्केटमधील दोन गाळ्यांचे वितरण शुक्रवारी करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलाणी, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, वारांगना, तृतीयपंथी, एचआयव्हीसह जगणारी बालके व महिला यांना समाजात हक्काचे स्थान मिळवून देणे आवश्यक आहे. यांच्यासाठी काम करणाऱया विधी व सेवा प्राधिकरणाला सर्वतोपरी मदत करू. तृतीयपंथी, वारांगना यांच्यासाठी काम करणाऱया स्वंयसेवी संस्थांना ऑफिस असावेत, यासाठी महानगरपालिकेने दोन गाळे उपलब्ध करून दिले आहेत. त्याबद्दल महानगरपालिका आयुक्त चौधरी व नगरसेविका ऍड. सुरमंजिरी लाटकर यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

  महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कायद्याबद्दल साक्षरता निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगून या घटकांच्या आर्थिक व सामाजिक उत्थानासाठी मदत करण्याची ग्वाही दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी चांगल्या समाजाची ओळख ही उंच इमारतींवरून ठरत नाही तर त्यामध्ये दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात अणण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, यावरून ठरते, असे सांगितले.

  यावेळी उमेशचंद्र मोरे यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत तळागाळातील घटकांना कायद्याबद्लचे ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगून महानगरपालिकेने दिलेले दोन गाळे कायमस्वरूपी मिळावेत. तृतीय पंथींयांसाठी वेगळी शौचालये असावीत, अशी मागणी केली. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या हस्तपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. नगरसेविका सुरमंजिरी लाटकर, पल्लवी कोरगांवकर, ऍड. शिवाजीराव राणे, अजित मोहिते, डॉ. अमरनाथ सेलमोकर, जावेद नदाफ, प्रा. हरिभाऊ वनमोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कडधान्य, शालेय साहित्य यांचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी सुषमा बटकटली, मैत्रीणी संघटनेच्या अध्यक्षा मयुरी अळवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. ऍड. भाग्यश्री कुलकर्णी यांनी आभार मानले.

Related posts: