|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भाऊ-बहिणीला मिळाली रक्षाबंधनाची अनोखी भेट

भाऊ-बहिणीला मिळाली रक्षाबंधनाची अनोखी भेट 

शेखर सामंत/ सिंधुदुर्ग

   भारतीय सेनेने काही निवडक सैनिकांसाठी स्पाईस जेट एअरवेज या विमान कंपनीच्या सहकार्याने यावर्षी दिल्ली येथे प्रथमच आयोजित केलेल्या रक्षाबंधनाच्या अनोख्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गचा सुपुत्र व 5 मराठा रेजिमेंटचा जवान देवेश नीळकंठ सावंत व त्याची विवाहित बहीण सौ. ज्योती प्रसन्ना देसाई (रा. वेंगुर्ले) यांची निवड झाली. या भाऊ-बहिणीला दिल्लीच्या मराठा बटालियनच्या कॅम्पमध्ये भव्य सोहळय़ात रक्षाबंधन करण्याचा सन्मान मिळाला. यावेळी सौ. ज्योती यांनी आपल्या भावासह तेथे उपस्थित गोरखा रेजिमेंटच्या जवानांनाही राखी बांधत शुभेच्छा दिल्या.

 सैनिकी परंपरा असलेल्या घराण्यात जन्म झालेला देवेश सावंत हा सावंतवाडीतील माजगाव-भटवाडीचा सुपुत्र. भाजपचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांची पत्नी सौ. ज्योती ही देवेशची सख्खी बहीण. यावर्षी रक्षाबंधनाचे औचित्य साधत सीमेवर लढणाऱया सैनिकांना त्यांच्या सख्ख्या बहिणींकडून राखी बांधता यावी व कौटुंबिक सोहळय़ाचा जवानांना आनंद मिळावा, या उद्देशाने ‘स्पाईस जेट’ या विमान कंपनीने भारतीय लष्कराच्या 5 मराठा रेजिमेंटच्या सहकार्याने दिल्ली येथे भारतीय सैन्यातील सर्व रेजिमेंटमधील निवडक जवानांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा

  भारतीय सेनेतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या सोहळय़ासाठी लॉटरी पद्धतीने नावे काढून सर्व रेजिमेंटमधून निवडक दहा जवानांची निवड करण्यात आली. हा संपूर्ण कार्यक्रम स्पाईस जेटने पुरस्कृत केला होता. यासाठी स्पाईस जेट व भारतीय आर्मीने देवेशची बहीण सौ. ज्योती देसाई यांच्याशी संपर्क साधून त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले. म्हापण येथील सैनिक पतसंस्थेच्या शाखाधिकारीपदी कार्यरत असलेल्या ज्योती देसाई यांनी हे निमंत्रण आनंदाने स्वीकारले. यासाठी वेंगुर्ले येथून थेट दिल्ली येथे जाण्या-येण्याच्या संपूर्ण विमान प्रवासाची जबाबदारी स्पाईस जेटने उचलली. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी सौ. ज्योती छोटय़ा कन्येला घेऊन दिल्लीला रवाना झाल्या. दिल्ली येथे मराठा रेजिमेंटच्या कॅम्पवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ज्योती यांच्याप्रमाणेच संपूर्ण देशभरातून निवडल्या गेलेल्या अन्य जवानांच्या बहिणीदेखील यावेळी उपस्थित होत्या. मराठा बटालियनच्या उभारण्यात आलेल्या एका खास शामियान्यात ज्योती यांनी भाऊ देवेश तसेच अन्य नऊ जवानांनाही राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

मी स्वत:ला भाग्यवान समजते! – सौ. ज्योती देसाई

            आपल्याला मिळालेल्या या अनोख्या संधीबद्दल बोलताना सौ. देसाई म्हणाल्या, तब्बल 16 वर्षांच्या कालावधीनंतर मला प्रत्यक्ष भावाच्या हातात राखी बांधून रक्षाबंधन करण्याचा आनंद घेता आला. त्या क्षणाचे वर्णन आपण शब्दात करू शकत नाही. देशासाठी सीमेवर लढणाऱया भावाला प्रत्यक्ष भेटून राखी बांधता यावी, अशी प्रत्येक बहिणीची तीव्र इच्छा असते. परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव ते शक्य होत नाही. मात्र यावर्षीपासून भारतीय सेनेने निवडक का असेना पण काही जवानांना ही संधी उपलब्ध करून देत देशभरातील भगिनींच्या भावनांचा सन्मान केला. ही संधी सर्वप्रथम आपणास मिळाली, त्याबद्दल मी व माझा भाऊ आम्ही दोघे स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. भारतीय सेनेने आम्हाला दिलेला हा सन्मान असून या सेनेची व स्पाईस जेट कंपनीची आपण आभारी आहे.

Related posts: