|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा लाईट इन्फंट्रीचे कार्य देशाला भूषणावह

मराठा लाईट इन्फंट्रीचे कार्य देशाला भूषणावह 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रातील सैनिकी प्रशिक्षणाची व्यवस्था परिपूर्ण आहे. यामधून देशरक्षणासाठी लढणाऱया जवानांची फौज निर्माण होणे, हे केंद्रासाठी आणि देशासाठी भूषणावह आहे, असे विचार नवी दिल्ली येथील सुरक्षा रक्षक विभागाचे महानिरीक्षक मेजर जनरल आसिफ मिस्त्री यांनी काढले.

येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा निरोपपर पथसंचलन समारंभ शनिवारी केंद्र आवारातील मैदानावर झाला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल आसिफ मिस्त्री (अतिविशिष्ट सेवा मेडल, सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल) उपस्थित होते. त्यांनी जवानांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच जवानांना देशरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

नऊ महिन्यांच्या कालावधीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या इन्फंट्री जवानांनी यावेळी देशरक्षणासाठी सेवेत रूजू होण्याची शपथ घेतली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवाड, डेप्युटी कमांडंट जयंतकुमार बरूआ आदींसह केंद्राचे अन्य वरि÷ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जवानांनी शानदार पथसंचलनाद्वारे त्यांना मानवंदना दिली.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाचे नेतृत्त्व परेड ऍडज्युटंट कॅप्टन रॉबिन अब्राहम यांनी केले. मिलिटरी बॅन्डचे नेतृत्त्व नायब सुभेदार जी. आरोग्यस्वामी यांनी केले. संचलन प्रमुख म्हणून शिपाई अक्षय पाटील यांनी कार्य केले.

विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिपाई अनिल तमुसे, नामदेव घुगे, अक्षय पाटील, शिवानंद राणोजी, गणेश सुतार यांना चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट समूह म्हणून हिली कंपनीला गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला जवानांचे पालक व कुटुंबीय बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Related posts: