|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बिटस् पिलानीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

बिटस् पिलानीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू 

प्रतिनिधी/ वास्को

हेडलॅण्ड-सडय़ावरील जापनीज गार्डनजवळील समुद्रात बुडून सांकवाळच्या बिटस् पिलानी गोवा कॅम्पसच्या विद्यार्थ्याला मृत्यू येण्याची घटना काल सोमवारी दुपारी घडली. मयत विद्यार्थ्याचे नाव हर्षित वृंदावन शर्मा (22) असे आहे.

 बिटस् पिलानी इन्स्टिटय़ूटच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा रविवारी पदवीदान समारंभ होता. त्यामुळे काल सोमवारी या संस्थेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. मयत हर्षित शर्मा व त्याचे चार सहकारी सडय़ावरील समुद्रकिनाऱयावर आले होते. हे पाचही विद्यार्थी गुडघाभर पाण्यात उतरले. यावेळी मोठय़ा लाटेबरोबर दोघे विद्यार्थी पाण्यात खेचले गेले. तिघा विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला खेचून बाहेर काढले. मात्र हर्षित शर्मा हा त्यांच्या हाती लागू शकला नाही. त्यामुळे तो बुडाला. या घटनेमुळे या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ पसरला व ते भयभीत झाले.

हार्बर येथील सागरी पोलीस दलाला या घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस दलाच्या जवानानी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, तो वाचू शकला नाही. चिखली येथील चिखली कुटीर रूग्णालयात हलवण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. मुरगाव पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मूळ मथुरा (उत्तरप्रदेश) येथील हर्षित शर्मा हा सांकवाळ येथील बिटस् पिलानी इन्स्टिटय़ूटमध्ये इलेक्ट्रॉनिक सायन्समधील चौथ्या वर्षात शिकत होता.