|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आडीतील तरूणाचा खाणीत बुडून मृत्यू

आडीतील तरूणाचा खाणीत बुडून मृत्यू 

प्रतिनिधी /रत्नागिरी

चुलत भावांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चिरेखाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील आडी-शिरगाव येथे घडली. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची शहर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष यशवंत पालकर (31) असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी दहिहंडीच्या दिवशी संतोष त्याचे चुलत भाऊ गौरव व राकेश पालकरसोबत आंघोळ करण्यासाठी शिरगाव परिसरातील चिरेखाणीवर गेले होते. आंघोळ करतेवेळी गौरव व राकेश हे पाण्याबाहेर बसलेले असताना संतोषने पुन्हा पाण्यात जोरात सुर मारला. बराच वेळ तो पाण्याबाहेर न आल्याने गौरव व राकेश संभ्रमात पडले. तो आतच अडकल्याची शंका आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धावाधाव केली. गंभीर दुखापत झाल्याने तळात जाऊन बसलेल्या संतोषला अथक प्रयत्नाने पाण्याबाहेर काढण्यात आले पण त्याची प्रकृती गंभीर होती.

तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या निधनाने शिरगाव-आडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष हा उत्तम टेलरिंग कारागीर म्हणून परिचित होता. त्याचा गेल्या मे महिन्यातच विवाह झाला होता.

खेडमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू

प्रतिनिधी /खेड

सुकिवली येथील चोरद नदीपात्रात पोहताना पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रबी जहानबल (28, रा-पश्चिम बंगाल, सध्या भरणे) असे मृताचे नाव आहे.

पोहता येत नसतानाही रबी मित्रांसमवेत पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.