इंग्लंडने विंडीजला 168 धावांवर गुंडाळले

विंडीज-इंग्लंड डे -नाईट कसोटी : जेम्स अँडरसन, रोलँड जोन्सचा भेदक मारा
वृत्तसंस्था/ एजबॅस्टन
येथे इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या डे-नाईट कसोटीत तिसऱया दिवशी विंडीजच्या पहिल्या डावाची घसरगुंडी उडाली. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व रोलँड जोन्सच भेदक माऱयासमोर विंडीजचा पहिला डाव 47 षटकांत 168 धावांवर आटोपला. जेरॉम ब्लॅकवूडने सर्वाधिक 79 धावा फटकावल्या. इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 514 धावांवर घोषित केला.
तत्पूर्वी, विंडीजने 1 बाद 44 धावांवरुन तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. मात्र इंग्लंडच्या वेगवान माऱयासमोर विंडीजचा पहिला डाव 47 षटकांत 168 धावांवर आटोपला. अर्धशतकवीर जेरॉम ब्लॅकवूड वगळता इतर फलंदाजानी सपशेल निराशा केली. ब्लॅकवूडने 76 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह नाबाद 79 धावांचे योगदान दिले. काईल होप (25), केरॉन पॉवेल (20) धावा फटकावल्या. इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसनने 3, रोलँड जोन्स, स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 8/514 घोषित, विंडीज प.डाव 47 षटकांत सर्वबाद 168 (क्रेग ब्रेथवेट 0, केरॉन पॉवेल 20, काईल होप 25, शेई होप 15, रोल्टन चेस 0, जेरॉम ब्लॅकवूड नाबाद 79, डॉवरिच 4, जेसॉन होल्डर 11, केमार रोच 5, शेई होप 15, जोसेफ 6, अँडरसन 3/34, रोलँड जोन्स 2/31, ब्रॉड 2/47, मोईन अली 1/15).