|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » राधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात

राधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात 

मिळालेल्या भूमिकेचे सोने करणे ही चांगल्या कलाकाराची मोठी खूण. भूमिकेसाठी त्या पात्राचा सखोल अभ्यास केलेल्यांच्या अनेक गोष्टी आपण यापूर्वी पाहिल्या असणार. परंतु, पुण्याच्या राधिका देशपांडेने भूमिकेसाठी केलेला अभ्यास आज सगळीकडे चर्चेचा विषय ठरतो आहे. ‘आरती-द अननोन लव्ह स्टोरी’ या सिनेमातीत नाजनीन या मुस्लीम मुलीच्या भूमिकेसाठी तिने सलग तीन दिवस मुंबईच्या एका दर्ग्यामध्ये घालवले. उद्देश हाच होता की, दर्ग्यात येणाऱया मुस्लीम मुली आणि बायकांना जवळून पाहता यावे, त्यांचे वागणे, बोलणे, राहणीमान कळावे म्हणून तिने हा केलेला खटाटोप.

याबद्दल राधिका सांगते की, ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतल्या बबली आणि बिंदासपेक्षा खूपच निराळी अशी ही नाजनीन मुस्लीम मुलीची भूमिका होती. एका सहदिग्दर्शकाने माझं नाव सुचवल्याने मला ही भूमिका मिळाली. नाजनीन नावाच्या मुलगीची भूमिका मी साकारली आहे. जिच्या अब्बुला बरं नाहीये म्हणून त्यांना रुग्णालयामध्ये आरती शेजारी भरती केलं आहे. नाजनीनची देखील एक गोष्ट आहे जी बोलण्यातून ती व्यक्त करते. नाजनीनने आजवर खूप सोसलं आहे, घरची परिस्थिती जेमतेमच आहे, त्यात देखील ती खंबीरपणे येणाऱया प्रत्येक प्रसंगाचा सामना करते. तिच्या बुरख्याआड अनेक दु:खं दडली आहेत. मुस्लीम बायका आणि मुली कशा असतात, कशा वागतात, कशा बोलतात यासाठीच मी मुंबईच्या एका दर्ग्यात सलग तीन दिवस जात होती. बाहेर नमाज पढणाऱया मुलींशी मी मैत्री केली आणि मग मला त्यांच्यात एक नाजनीन सापडली असं बोलताना राधिका भावूक झाली.

राधिका पुढे सांगते की, आरती सिनेमात आरती हिची गोष्ट जरी मुख्य असली तरी माझ्या वाटय़ाला आलेले नाजनीनचे सीन्स प्रेक्षकांच्या डोळय़ात नक्कीच पाणी आणतील असा माझा विश्वास आहे. दर्ग्यातल्या एका मुलीसोबत मी बाहेर लोकल ट्रेनचा प्रवास देखील केला. तिच्याशी जवळीक झाल्यावर मला ती कुठे आणि कशी राहते, काय खाते, कशी बोलते, कपडे कोणते घालते, कसे घालते एवढंच नाही तर तिच्या शरीराला येणारा अत्तराचा सुगंध देखील मला अनेक गोष्टी शिकवून गेला. त्यामुळेच मी माझ्या आवाजात देखील बदल केला आहे. सिनेमात नाजनीनचा आवाज तुम्हाला राधिकाचा वाटणार नाही एवढंच मी सांगेल. तिच्या कपडय़ांचा रंग हा देखील मला तिथेच मिळाला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आरती या सिनेमाची लेखिका आणि दिग्दर्शिका सारिका मेने या देखील एक स्त्राr असल्याने त्यांना हवं ते मला देता आलं. त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं. अशा प्रकारचा अभ्यास करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कारण मला दर्ग्यात एक मुस्लीम मुलगी म्हणूनच जायचं होतं. आयुष्यभर विसरणार नाही असा तो अनुभव होता. पण, यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या प्रत्येक कलाकाराला नेहमीच प्रेरणादायी ठरत असतात.