|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचा लंकेवर दणदणीत विजय

भारताचा लंकेवर दणदणीत विजय 

धवनचे दमदार शतक, कोहलीचे अर्धशतक, अक्षरचे 3 बळी, डिक्वेलाचे अर्धशतक वाया

वृत्तसंस्था/ डंबुला

चांगली सुरुवात करूनही यजमान लंकेला भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत लाभ घेता आला नाही आणि त्यांचा डाव 44 व्या षटकांत 216 धावांत आटोपला. त्यांचे शेवटचे 9 फलंदाज केवळ 77 धावांत बाद झाले.

निरोशन डिक्वेला (65) व दनुष्का गुणथिलका (35) यांनी लंकेला 73 धावांची भक्कम सलामी दिली होती. पण ही जोडी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी आत्मघाती फलंदाजी केल्याने 1 बाद 139 अशा स्थितीनंतर 44 व्या षटकांत 216 धावांत त्यांचा डाव आटोपला. गेल्या वषीच्या ऑक्टोबरनंतर पहिला वनडे खेळणारा डावखुरा स्पिनर अक्षर पटेलने अप्रतिम गोलंदाजी करीत 34 धावांत 3 बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. अक्षरने यापूर्वी 2015 मध्ये द.आफ्रिकेविरुद्ध 39 धावांत 3 बळी मिळवित सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती.

कसोटी मालिकेत सपशेल शरणागती पत्करल्यानंतर वनडे मालिकेत सुधारित कामगिरी होण्याची अपेक्षा घेऊन आलेल्या स्थानिक प्रेक्षकांची पुन्हा एकदा निराशा झाली. कोहलीने या दौऱयात सलग चौथ्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर यजमानांना फलंदाजी दिली. त्याने या सामन्यात अक्षर पटेल व लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांनी संधी दिली. कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय मात्र आश्चर्यकारक होता.

अर्धशतकी सुरुवातीनंतर डाव गडगडला

डिक्वेला व गुणथिलका यांनी भुवनेश्वर व जसप्रित बुमराह यांची पहिली पाच षटके शांतपणे खेळून काढल्यानंतर डिक्वेलाने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. पहिल्या दहा षटकांत त्यांनी 55 धावांपर्यंत मजल मारली. त्यांनी केवळ 53 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. डिक्वेलाने नंतर 65 चेंडूत पाचवे वनडे अर्धशतक पूर्ण केले. हे दोघे खेळपट्टीवर बराच वेळ ठाण मांडणार असेच वाटत होते. पण फिरकी मारा विशेषता केदार जाधवचा, सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलली. 14 व्या षटकात डिक्वेला धावचीत होताहोता बचावला. पण याच षटकात गुणथिलका चहलला अनावश्यक रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तो बाद झाल्यानंतर कुसल मेंडिसने काही आकर्षक फटके मारले आणि डिक्वेलासमवेत दुसऱया गडय़ासाठी 65 धावांची भर घातली. जाधवने 25 क्या षटकात डिक्वेलास पायचीत करून ही जोडी फोडली. डिक्वेलाने 74 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार ठोकले. 28 व्या षटकांत मेंडिसला अक्षर पटेलने त्रिफळाचीत केले. त्याने 37 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. यावेळी लंकेची स्थिती 3 बाद 150 अशी होती आणि ते किमान पावणेतीनशेची मजल मारतील असे वाटले होते.

मॅथ्यूजची एकाकी लढत

पण भारतीय स्पिनर्सनी त्यांना जखडून ठेवले आणि फटकेबाजीच्या मोहात पडल्याने त्यांचा डाव गडगडण्यास वेळ लागला नाही. 33 क्या षटकात प्रथम कर्णधार उपुल थरंगा (13) जाधवच्या फुलटॉसवर लाँगॉनवर झेल देऊन बाद झाला. पुढच्या षटकात कोहलीने चमारा केपुगेदराला एका धावेवर थेट फेक करीत धावचीत केले. नंतर बुमराहने थिसारा परेराला शून्यावर त्रिफळाचीत केल्यावर लंकेच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या आशा मावळल्या. अक्षरने वनिंदा हसरंगा व लक्षण संदकन यांना बाद केले. माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने थोडाफार प्रतिकार केला. मलिंगाने त्याला साथ दिल्याने नवव्या गडय़ासाठी दोघांनी 22 धावांची भर घातल्यामुळे लंकेला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. चहलच्या एका वाईड चेंडूवर मलिंगा यष्टिचीत झाला. मॅथ्यूजने आपल्या परीने प्रयत्न केले. पण 44 व्या षटकात विश्वा फर्नांडेला बुमराहने त्रिफळाचीत करून लंकेचा डाव संपुष्टात आणला. मॅथ्यूज 36 धावांवर नाबाद राहिला. त्याने 50 चेंडूत एक चौकार, एक षटकार मारला. भारतातर्फे अक्षरने तीन तर बुमराह, केदार जाधव, चहल यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

धावफलक

लंका : डिक्वेला पायचीत गो. जाधव 64 (74 चेंडूत 8 चौकार), गुणथिलका झे. राहुल गो. चहल 35 (44 चेंडूत 4 चौकार), कुसल मेंडिस त्रि.गो. अक्षर पटेल 36 (37 चेंडूत 5 चौकार), थरंगा झे. धवन गो. जाधव 13 (23 चेंडू), मॅथ्यूज नाबाद 36 (50 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), केपुगेदरा धावचीत कोहली 1, हसरंगा झे. जाधव गो. अक्षर 2, थिसारा परेरा त्रि.गो. बुमराह 0, संदकन पायचीत गो. अक्षर 5, मलिंगा यष्टिचीत धोनी गो. चहल 8 (6 चेंडूत 1 षटकार), फर्नांडो त्रि.गो. बुमराह 0, अवांतर 16, एकूण 43.2 षटकांत सर्व बाद 216.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-73, 2-139, 3-150, 4-166, 5-169, 6-176, 7-178, 8-187, 9-209, 10-216.

गोलंदाजी : भुवनेश्वर 6-0-33-0, हार्दिक पंडय़ा 6-0-35-0, बुमराह 6.2-0-22-2, युजवेंद्र चहल 10-0-60-2, केदार जाधव 5-0-26-2, अक्षर पटेल 10-0-34-3.