|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » धर्म नीतीचे ऐक्मय

धर्म नीतीचे ऐक्मय 

भगवान अवतार घेऊन काय करतात हे सांगताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात-

 धर्मासीं नीतीशीं । सेस भरिं ।। माउलींच्या या विधानावर थोडे चिंतन करूया. सेस भरणे म्हणजे मळवट भरणे. भगवान अवतार घेऊन धर्माचे नीतीशी लग्न लावून देतात, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. धर्माचे नीतीशी ऐक्मय घडवून आणणे, त्यांचे मिलन घडवून आणणे, हे भगवंताचे अवतार कार्य आहे. धर्माचा मुख्य आधार नीती आहे. आपण धार्मिक आहोत आणि धर्माप्रमाणे आपण वागतो असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? आपण सर्व धार्मिक कर्मकांड, पूजा, अर्चा केली पण नित्य आचरणात आपण अनीतीने वागत असू तर आपण धार्मिक आहोत काय? एखादा लाचखाऊ अधिकारी मिळालेल्या लाचेच्या पैशातून काही पैसे देवळाच्या फंड पेटीत अर्पण करत असेल तर तो धर्म होतो काय? माउली उदाहरण देतात व प्रश्न विचारतात-

अहो वसतीं धवळारें । मोडूनि केली देव्हारे । नागवूनि वेव्हारें । गवांदी घातली ।। अहो, नांदती घरे मोडायची आणि त्या सामानाने देव्हारे करायचे आणि देवळे बांधायची, व्यवहारात लोकांना फसवून लुटायचे आणि तीर्थक्षेत्री अन्नछत्र घालायचे, ही-इया करणी कीं चेष्टा? हे धर्माचे आचरण नसून धर्माची चेष्टा नव्हे काय? धर्माच्या नावाखाली लोकांची घरे लुटली जातात, वस्त्या उद्ध्वस्त केल्या जातात तेव्हा धर्माचा उत्कर्ष होतो काय? खरा धर्म कोणता? पू. साने गुरुजींची सुंदर प्रार्थना अनेकांना मुखोद्गत असेल –

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ।।

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित ।

तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।

जयांना ना कोणी जगती,  सदा ते अंतरी रडती ।

तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे ।। समस्तां धीर तो द्यावा,  सुखाचा शब्द बोलावा ।

अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ।। सदा जे आर्त अतिविकल,  जयांना गांजती सकल । तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ।। कुणा ना व्यर्थ शिणवावे,  कुणाला ना व्यर्थ हिणवावे।  समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ।। प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी । कुणा ना तुच्छ लेखावे,  जगाला प्रेम अर्पावे ।। असे जे आपणापाशी असे,  जे वित्त वा विद्या। सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे।। भरावा मोद विश्वात,  असावे सौख्य जगतात। सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे।। असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे । परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ।। जयाला धर्म तो प्यारा,  जयाला देव तो प्यारा। त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे ।। प्रेम, दया हाच खरा धर्म, सत्य हाच खरा धर्म अशी नीती आहे. संतही हाच धर्म मानतात. तुकाराम महाराज म्हणतात- सत्य तोचि धर्म । पण धर्मक्षेत्रच जेव्हा युद्धाची रणभूमि बनते तेव्हा तुकाराम महाराजांचे बोल आठवावे- पाप त्याचें नाव न विचारितां नीत । भलतेंचि उन्मत्त करी सदा ।।

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: