|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रेल्वेमार्गासाठी चिपळूण-कराडचे नागरिक रेल्वेमंत्र्याना भेटणार!

रेल्वेमार्गासाठी चिपळूण-कराडचे नागरिक रेल्वेमंत्र्याना भेटणार! 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व, शौकत मुकादम यांच्याबरोबरच्या बैठकीत दिले आश्वासन, गुहागर-विजापूर महामार्गाबाबत लवकरच घेणार बैठक

 

प्रतिनिधी /चिपळूण

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया महत्त्वाकांक्षी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा गेल्यावर्षी स्वातंत्र्यदिनी करार झाल्यानंतरही या रेल्वेमार्गाबाबत पुढे कोणतीच कार्यवाही न झाल्याने येत्या 5 सप्टेंबरनंतर कराड आणि चिपळूणच्या नागरिकांनी एकत्रितपणे रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले. सोमवारी कराड येथे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची यासंदर्भात बैठक झाल्यानंतर या रखडलेल्या प्रश्नाला गती देण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर गुहागर-विजापूर महामार्गाबाबतही वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचेही आश्वासन चव्हाण यांनी दिले.

कोकण रेल्वे मार्गावर 103 कि. मी. लांबीचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. व शापूरजी पालोनजी कॉर्पोरेशन या कंपन्यांमध्ये सामंजस्य करारावर गेल्यावर्षी स्वाक्षऱया झाल्या. मार्च 2011मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी कराड-चिपळूण या मार्गासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य शासनाने खर्चाच्या पन्नास टक्के वाटा उचलण्याचे जाहीर करत तशी अर्थसंकल्पात तरतूदही केली, तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 300 कोटीची तरतूदही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेली आहे. असे असतानाही या रेल्वेमार्गाबाबत वर्षभरात कोणतीही कार्यवाही न झाल्याने यासंदर्भात कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष मुकादम, उद्योजक इब्राहिम दलवाई, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पालांडे, विकास गमरे यांच्यासह नागरिकांनी सोमवारी कराड येथे जाऊन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी या रेल्वेमार्गाला गती मिळण्याच्यादृष्टीने आपल्या नेतृत्वाखाली कराड आणि चिपळूण येथील एकत्रित शिष्टमंडळांच्या माध्यमातून रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी अशी विनंती चव्हाण यांना मुकादम यांनी केली.

यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनीही या रेल्वेमार्गासंदर्भात आपण 1992 पासून पाठपुरावा करत आहोत. रेल्वेमार्गासाठी राज्याच्यावतीने आपण आर्थिक तरतूदही केलेली आहे. मात्र प्रकल्प मंजुरी, त्यानंतर करार आणि निधीची उपलब्धता झालेली असतानाही वर्षभर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण आहे. त्यामुळे चिपळूण आणि कराड येथील नागरिकांना घेऊन गणेशोत्सवानंतर रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. दरम्यान, गुहागर-विजापूर महामार्गाबाबत सद्यस्थितीत गुहागर व चिपळूण तालुक्यात निर्माण झालेल्या वादाबाबत मुकादम यांच्यासह उद्योजक इब्राहीम दलवाई यांनी माहिती दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले, की मुळातच नागरिकांना विश्वासात घेऊनच काम करणे आवश्यक आहे. या मार्गात कुंभार्ला घाटात बोगदा काढला तरच वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शहरे आणि लोकवस्तीच्या ठिकाणी उपाययोजना करणेही तितकेच गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच कराड येथे महामार्गाचे वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या प्रकल्पालाही चालना देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील असे सांगितले.

Related posts: