|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » देवाची नवसाची लेकरे

देवाची नवसाची लेकरे 

तुकाराम महाराज हे अवतारी पुरुष असल्याने त्यांचा आणि पातकांचा काय संबंध? ते पतित असूच शकत नाहीत. पण भक्तीच्या खेळात देवाशी  प्रेमाचे भांडण करण्यासाठी ते तुमची, आमची पतिताची भूमिका घेऊन देवाला विचारतात-देवा, ज्या भाग्याने तुला नाव-रूप प्राप्त झाले, ते तुझे भाग्य म्हणजे आम्ही पतित माणसे आहोत. आम्ही पतित नसतो तर कोण रे तुला निराकार अवस्थेत विचारले असते? अंधाराने दिव्याला शोभा आणलेली असते. सोन्याच्या कोंदणाने रत्नाला शोभा आणलेली असते. अनेक रोगांनी धन्वंतरीला (डॉक्टरला) उजेडात आणले. निरोगी माणसाने त्या धन्वंतरीची कशाकरिता चौकशी करावी? विषातील मारक गुणामुळे अमृताला किंमत आली. पितळ मोलाने कमी असते म्हणून सोने मोलाने उंच झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आहोत म्हणून तुला देवपणा आलेला आहे हे लक्षात घे.

आणखी एका अभंगात तुकाराम महाराज गमतीने म्हणतात –

जरी मी पतित नव्हतो देवा ।  तरी तूं पावन कैंचा तेव्हां।। म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ।। देवा, मी जर पतित नसतो तर तू पावन तरी कसा झाला असतास? म्हणून हे कृपानिधे, पतितपावन या शब्दामध्ये पतित हे माझे नाव आधी आहे, आणि पावन हे तुझे नाव नंतर आहे.

भक्त ही देवाची लेकरे खरी! पण ती साधीसुधी लेकरे नाहीत बरे! तुकाराम महाराजांचा हा गोड अभंग पहा- नवां नवसांची । जालों तुम्हासी वाणीची ।।

कोण तुझें नाम घेते । देवा पिंडदान देते ।।

कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ।।

तुका म्हणे पांडुरंगा । कोणा घेतोसी वोसंगा ।।

देवा, आपण अनेक नवस केलेत म्हणून मोठय़ा नवस सायासानें झालेली आम्ही आपली दुर्मिळ मुले आहोत. आमच्या जन्मापूर्वी तुम्हाला मुलाची वाणच होती. देवा, आम्ही जन्माला आलो नसतो तर तुझे नाव तरी कोणी घेतले असते? आणि देवा, तुला पिंडदान (देहसमर्पण) कोणी केले असते? आम्ही नसतो तर तुझ्या मागे पुढे राहणारे कोण होते? आणि तुझ्याशी स्पष्टपणे बोलण्याकरिता तरी कोण होते? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जन्मलो नसतो तर तू कोणाला पदरात घेतले असतेस? कोणाला मांडीवर घेऊन खेळविले असतेस?

भक्तीचा खेळ खूप मजेचा, देव आणि भक्त या दोघांनाही विलक्षण आनंद देणारा आहे. अहो! एवढेच कशाला, तुमच्या आमच्यासारख्या प्रेक्षकांनाही हा खेळ मोठाच आनंद देणारा आहे. आता खेळ म्हटला हार, जीत आणि डाव प्रतिडाव व्हायचेच. काही डाव देव जिंकायचा तर काही डाव भक्तही जिंकायचे. मग भांडणे, चिडाचीड, रडी खाणे हेही होते बरे! तुकाराम महाराज संत नावाच्या पंचांकडे काय तक्रार करतात पहा – पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परि नामसेंडी धरिली आम्हीं ।। आतां संतांनी करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ।।