|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » अशोक पत्की यांचा पहिला संपूर्ण गझल संग्रह

अशोक पत्की यांचा पहिला संपूर्ण गझल संग्रह 

ललित संगीतातील गझल हा प्रकार त्यातील आशय, शब्दांची विशिष्ट ठेवण-मांडणीमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरतो. मराठी गझल हा रसिकांचा एक आवडीचा प्रकार आहे. त्यामुळे स्वरानंद प्रतिष्ठानने नुकताच ‘चाहुल चांदण्यांची’ हा आशयघन श्रवणीय गझलांच्या सीडीनिर्मितीचा उपक्रम संपन्न केला. या गझलांच्या काव्यरचना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार हिमांशु कुलकर्णी यांच्या असून त्यांना स्वरसाज चढवलाय प्रतिभावंत संगीतकार अशोक पत्की यांनी. सध्याच्या पिढीतील रसिकप्रिय युवागायिका पूजा गायतोंडे आणि खास गझल गायनासाठी प्रसिद्ध असलेले गायक दत्तप्रसाद रानडे यांनी या गझलांचे गायन करून या शब्दस्वरांच्या बासरीत प्राण फुंकलेत.

हिमांशु कुलकर्णी एक सहृदयी कवी म्हणून त्यांच्या गझलांद्वारे आपल्या समोर येत असले तरी पेशाने ते उच्च व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून उद्योगजगतात 50 वर्षे कार्यरत आहेत. ते महाराजा सयाजी विद्यापीठातून बीटेकचे सुवर्णपदक प्राप्त पदवीधर असून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून एमबीएची पदवी प्राप्त केली. त्यांचे बाभुळवन, मी- माझी सावली, पणती जपून ठेवा, शहर- एक कबर, कविता उद्ध्वस्त रात्रींच्या, या पाणपोईवर मिळते फक्त तहान हे मराठीतील काव्यसंग्रह आजवर प्रसिद्ध झाले आहेत.

कवी हिमांशु यांच्या काव्यात्मकतेचा प्राजक्तगंध असलेल्या गझलांना सिद्धहस्त ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी हळुवार स्वरांनी गोंजारलंय, सजवलंय.  अशोक पत्की यांनी यापूर्वी चित्रपटांसाठी तसेच भावगीत म्हणून काही गझलांना स्वरबद्ध केले आहे. परंतु त्यांनी स्वरबद्ध केलेल्या श्रवणीय आठ गझला ‘चाहुल चांदण्यांची’ अल्बमद्वारे एकत्रितपणे सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.  गझलांच्या अल्बममुळे एक चांगले काम केल्याचे समाधान मिळालंय, असे अशोक पत्की म्हणाले. कवी हिमांशु कुलकर्णी आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या अमफतमहोत्सवाच्या टप्प्यावर युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने रसिकांसाठी स्वरानंद प्रतिष्ठाननिर्मित चाहुल चांदण्यांची हा अल्बम सादर करण्याचे औचित्य साधले आहे. हा कार्यक्रम नुकताच मुंबईतील सिटीलाईट येथे संपन्न झाला. या सोहळय़ाला  गायक सुरेश वाडकर, सोनाली कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे होते तर, मानव नाईक, विनोदवीर विक्रम साठय़े, युनिव्हर्सलचे राजन प्रभू, रेड बॉक्स इव्हेंट्सचे अक्षय कुलकर्णी, स्वरानंद प्रकाशनचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश बोंडे उपस्थित होते.