|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » मल्ल सतीश कुमारला भरपाई देण्याचा आदेश

मल्ल सतीश कुमारला भरपाई देण्याचा आदेश 

आशियाई स्पर्धेत जाण्यापासून रोखल्याबद्दल 25 लाख देण्याचा दिल्ली न्यायालयाचा निकाल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2002 मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा मनाई केल्याबद्दल नामवंत मल्ल सतीश कुमारला 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला आहे. उत्तेजक घेतल्याच्या संशयावरून त्याला स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते.

भारतीय कुस्ती फेडरेशनने सतीश कुमारला भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून खेळाशी संबंधित नसलेल्या व्यक्ती फेडरेशन्सचा कारभार पाहत असल्यामुळेच भारत जागतिक स्पर्धांत पदके मिळवू शकत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सीआयएसएफमध्ये कार्यरत असेल्या सतीश कुमारने 2006 च्या मेलबोर्न राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच लॉस एंजेल्स येथे झालेल्या विश्व पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून देशाचा गौरव वाढविला आहे. सतीश कुमारची कारकीर्द जवळपास संपुष्टात आणण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी गुंतलेल्या सर्व पदाधिकाऱयांची चौकशी करण्यात यावी, असा आदेशही अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुरिंदर एस. राठी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही व क्रीडापटू अशाप्रकारे बदनाम होणार नाहीत याची दक्षताही केंदाने घेण्याची सूचना त्यांनी दिली आहे.

पंजाबचा मल्ल सतीश कुमारची बुसानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती. पण अन्य एका खेळाडूसह त्याला विमानतळावरच स्पर्धेला जाण्यापासून रोखण्यात आले. कारण याच नावाचा पश्चिम बंगालचा एक मल्ल असल्याने अधिकाऱयांचा गोंधळ झाला होता. प.बंगालचा हा मल्ल उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई झाली होती. क्रीडा फेडरेशनने सतीश कुमारला रोखल्यामुळे त्याची बदनामी झाली असून त्याला प्रचंड मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले आहे. त्याची काहीही चूक नसताना त्याला विमानातून उतरवण्यात आले आणि दोषी मल्ल तोच असल्याचा भूमिका फेडरेशनने घेतली आहे, असेही न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे.