|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हेरिटेज सिटीचे केसरकरांचे स्वप्न अधुरेच

हेरिटेज सिटीचे केसरकरांचे स्वप्न अधुरेच 

सावंतवाडी शहरातील एकाही वास्तूचे हेरिटेज म्हणून नोंद नाही

प्रतिनिधी / सावंतवाडी :

सावंतवाडी शहराला संस्थानकालीन वारसा आहे. अशा या शहरात संस्थानकालीन अनेक वास्तू होत्या आणि आहेत. या वास्तूंचे जतन करून सावंतवाडी शहराचा ‘हेरिटेज सीटी’ अशी ओळख निर्माण होण्यासाठी सध्या गृहराज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी पावले उचलली होती. ‘हेरिटेज शहर’ असा नावलौकिक निर्माण करून पर्यटन वाढीला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु हरिटेज शहर म्हणून शहर विकसित करण्याचे केसरकर यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. आता तर सावंतवाडी नगरपालिकेकडे सावंतवाडी शहरातील एकही वास्तू ‘हेरिटेज’ म्हणून नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे. नोंदच नसेल तर ‘हेरिटेज’ वास्तूंचे जतन कसे होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी नगरपालिकेकडे ‘हेरिटेज’ वस्तूंचे नोंद नसल्याचे स्पष्ट केले, अशी नोंद कदाचित पुरातत्व खात्याकडे असेल, असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी शहराला 350 वर्षाहून अधिक वर्षाचा इतिहास आहे. संस्थानकाळात वसलेल्या शहराची पूर्वी सुंदरवाडी म्हणून ओळख होती. त्यानंतर सुंदरवाडीचे नाव सावंतवाडी असे संस्थानच्या राजघराण्याच्या आडनावावरून झाले. सावंतवाडी संस्थानने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. महात्मा गांधींनी सावंतवाडी संस्थानच्या बापूसाहेब महाराजांच्या राज्याला रामराज्य म्हणून गौरविले होते. सावंतवाडी संस्थानची ओळख अद्यापही सर्वदूर आहे. संस्थानकालीन शहरात राजवाडय़ासह कोलगाव दरवाजा, रघुनाथ मार्केट, ऐतिहासिक माठी तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची इमारत, सावंतवाडी पोलीस ठाण्याची इमारत तसेच विविध वाडय़ांत जुने वाडे आहेत. सावंतवाडी शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहराची ‘हेरिटेज शहर’ अशी ओळख निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले होते. हेरिटेज शहर म्हणून शहर विकसित करून पर्यटनाला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु त्यांचे स्वप्न भंगल्याचे दिसत आहे. सावंतवाडी चितारआळीत असलेली जुन्या पोलीस ठाण्याची इमारत जुनी असूनही जमीनदोस्त करण्यात आली. पोलीस ठाण्यातील सध्या असलेली इमारत पोलीस ठाणे स्थलांतरीत झाल्याने जमीनदोस्त करून तेथे पेट्रोल पंप उभारण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. तर शहरात असलेल्या जुन्या वाडय़ांची पडझड झाली आहे. केसरकर यांनी ऐतिहासिक इमारतींना आर्टिफिशलद्वारे रुप देऊन त्यांचा लूक बदलून पर्यटनदृष्टय़ा विकसित करण्यात येईल, असे सांगितले होते. तसेच या ठिकाणी कौले घालून ऐतिहासिक महत्त्व टिकवण्यात येईल. याद्वारे या ऐतिहासिक शहरातील वास्तू पाहण्यासाठी पर्यटक या शहरात येतील. परंतु यासंदर्भात काहीच झाले नाही. येथील सालईवाडय़ातील 1859 चे जुने चर्चही पाडण्यात आले. ऐतिहासिक वास्तू म्हणून तिचे जतन करता आले असते. परंतु तसा प्रयत्न झाला नाही. शहरातील रघुनाथ मार्केट, कोलगाव दरवाजा, आत्मेश्वर तळी अशा ठरावीक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु येथील परिस्थिती यथातथाच आहे.

सावंतवाडी शहराचा विचार केल्यास आता शहर सिमेंट काँक्रिटचे जंगल बनत चालले आहे. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1997 ला सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी शहराचे काँक्रिटीकरण करू देऊ नका. शहराचे ऐतिहासिक महत्त्व जपा, असा सल्ला दिला होता. परंतु 20 वर्षांनंतर शहराची परिस्थिती बदलली असून शहराचे काँक्रिटीकरण झालेले दिसत आहे. शहरातील ऐतिहासिकता लोप पावत चालली आहे. सावंतवाडी शहरात असलेल्या राजवाडा, मोती तलाव यामुळे शहराचे अजूनही ऐतिहासिक महत्त्व टिकून आहे.

शहरात सध्या 6419 रहिवासी इमारती, 2602 वाणिज्य आणि 150 शासकीय इमारतीची नोंद पालिकेकडे आहे. यात ‘हेरिटेज’ इमारतीची कुठेच नोंद नाही. पालिकेकडे ‘हेरिटेज’ इमारतींची नोंद नसेल तर पालिका त्याचे जतन कसे करणार असा प्रश्न आहे. मुख्याधिकारी द्वासे यांनी ‘हेरिटेज’ इमारतीची पालिकेकडे नोंद नसल्याचे मान्य केले. पुरातत्त्व विभागाकडे अशी नोंद असेल, असे स्पष्ट केले. नोंद नसेल तर बांधकाम करण्याला किंवा न करण्यापासून कसे रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला असता याबाबत त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.