|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सात वर्षेच काय, सातजन्मही वाट पाहेन!

सात वर्षेच काय, सातजन्मही वाट पाहेन! 

‘फयान’ वादळानंतरची सात वर्षे बेपत्ता सहा मच्छीमारांच्या कुटुंबियांसाठी वेदनादायीच

प्रशांत वाडेकर / देवगड :

‘फयान’ या भयानक समुद्री वादळाला सात वर्षे उलटली. तरीदेखील या वादळात देवगडमधील सहा बेपत्ता मच्छीमारांचा शोध लागलेला नाही. त्यांचे कुटुंबीय आजही डोळय़ात प्राण आणून त्यांची वाट पाहत आहे. ‘आजचा दिवस गेला, उद्या तरी येतील..’ या एकाच आशेवर ही कुटुंबे जगत आहेत. यातीलच बेपत्ता झालेल्या अनिलकुमार सहदेव सारंग यांची पत्नी सौ. आकांक्षा म्हणतात, ‘सात वर्षे काय, सात जन्मदेखील मी वाट पाहेन. अजूनही आम्ही आशा सोडलेली नाही. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आमची आर्त हाक निश्चितच ऐकेल!’

सात वर्षांपूर्वी म्हणजेच 10 नोव्हेंबर 2009 रोजीची ती काळरात्र आठवली की आजही अंगावर शहारे येतात. सिंधुदुर्गच्या समुद्र किनारपट्टीला ‘फयान’ वादळाचा प्रचंड तडाखा बसला. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या होडय़ा समुद्रात भरकटल्या. काही दिवसांनी काहींनी किनारा गाठला. काहींना वाचविण्यात यश आले. मात्र, यात देवगड तालुक्यातील नौका भरकटल्या. त्या नौकांवर असलेल्या सहा मच्छीमारांचा अजूनही शोध लागलेला नाही. ना त्यांचे मृतदेह मिळाले, ना त्यांच्या नौका. देवगडमधील बेपत्ता झालेल्यांमध्ये मच्छीमार अच्युत कोयंडे, अनिलकुमार सारंग, दीपक भाबल, उल्हास ढोके, प्रमोद इसकर, संजय साटम यांचा समावेश होता. हे सर्वजण 9 नोव्हेंबर 2009 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रामध्ये मासेमारीसाठी नौका घेऊन गेले होते. 10 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ‘फयान’ या वादळाने थैमान घातले. या वादळामध्ये सिंधुदुर्गातील सागरी किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. किनारपट्टीतील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका भरकटल्या गेल्या. त्यात कुठे गेल्या, त्याचा पत्ताच लागलेला नाही. देवगड येथील सौ. प्रतिमा लक्ष्मण जोशी यांच्या नौकेवर असलेले खलाशी अनिलकुमार सारंग यांचीही नौका भरकटली गेली. त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अनेकवेळा शोधकार्य राबविण्यात आले. कोस्टगार्ड, नेव्ही, कस्टम यांनी संयुक्त मोहीम राबवूनही बेपत्ता मच्छीमारांचा शोध लागला नाही. शासनाने त्यांना बेपत्ता म्हणून जाहीर केले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती म्हणून प्रत्येकी दोन लाखाची मदत केली. मात्र, आज या घटनेला सात वर्षे उलटून गेली आहेत. अद्यापही या बेपत्ता मच्छीमारांचा शोध लागलेला नाही. सात वर्षांनंतरही त्यांच्या कुटुंबियांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सात वर्षे होऊनही शासन अद्यापही त्यांना मृत म्हणून जाहीर करीत नाही. त्यामुळे कुटुंबियांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरातील कर्ताकरविताच नसल्याने या मच्छीमार कुटुंबियाची आर्थिक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. घरप्रपंच चालविण्यासाठी आज या कुटुंबियांना परिस्थितीशी झगडावे लागत आहे. शासनाने या कुटुंबियांकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेला नाही. ही कुटुंबे आजही आपापल्या परीने आपल्या बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सारंग कुटुंबावर मोठे संकट

यातील बेपत्ता झालेल्या अनिलकुमार सारंग यांच्या पत्नी आकांक्षा सारंग यांची भेट घेतली असता त्यांना आपले दुःख लपवता आले नाही. भरल्या डोळय़ांनी त्यांनी आपल्या पतीच्या बेपत्ता झाल्यानंतरच्या परिस्थितीचा पाढाच वाचला. पती बेपत्ता झाल्यानंतर शासनाने दोन लाखाची मदत केली. मात्र, घरावर कर्ज असल्याने शासनाने दिलेली मदत कर्ज फेडण्यात खर्ची झाली. त्यानंतर पोटच्या दोन पोरांना सांभाळण्यात, त्यांचे शिक्षण यामध्ये पोटची भूकही मारावी लागत आहे. आज परिस्थितीमुळे पुढील भविष्याचीही चिंता वाटू लागली आहे. पती आजही कुठेतरी हयात आहे, असे अंतःर्मन आपल्याला सांगत आहे. सोशल मीडिया, इंटरनेट या माध्यमांतून बेपत्ता होऊन सापडलेल्या व्यक्तींच्या चेहऱयातील साम्य ओळखून आम्ही तेथे जात खातरजमाही केली होती. मात्र, आमच्या पदरी निराशाच आली.