|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वन्यप्राण्यांचा प्रश्न खासदारांनी संसदेत मांडावा लागेल

वन्यप्राण्यांचा प्रश्न खासदारांनी संसदेत मांडावा लागेल 

प्रतिनिधी/ आजरा

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाय योजना करण्याचे काम वनविभागाकडून होत नाही. शिवाय वनविभागाचे बहुतांशी निर्णय केंद्रातून होत असल्याने आजरा तालुक्यीतल वन्यप्राण्यांचा हा प्रश्न खासदारांनी संसदेत मांडावा लागेल असा सूर आजरा येथे झालेल्या सर्वपक्षिय बैठकीत उमटला. वन्यजीवांच्या प्रश्नाबाबत आजरा येथे सर्वपक्षिय बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी जनता बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई होते.

प्रास्ताविकात कॉ. संपत देसाई यांनी तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण विभागात हत्ती, गव्यांसह वन्यप्राण्यांचा मोठा त्रास शेतकऱयांना सहन करावा लागत आहे. यावर ठोस उपाय योजना करण्यासाठी आजरा तालुक्यातून संघटीतपणे पाठपुरावा करण्याची गरज आहे. या प्रश्नाबाबत मुख्य वनसंरक्षकांसोबत प्रशासन आणि शेतकरी व प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याबाबत प्रांताधिकारी संपत खिलारे यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन कॉ. देसाई यांनी केले. या निवेदनातून मांडलेल्या समस्या आणि सुचविण्यात आलेल्या उपायांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी गोविंद पाटील यांनी वन्यजीवांनी केलेल्या पिकाची नुकसानीचा पिक विम्यात समावेश करण्याबाबत पाठपुरावा करण्याची सूचना मांडली. अनेक ठिकाणी वनविभागाने चर खुदाई केली आहे पण त्यातूनही वन्यप्राणी शेतात येत असून चर खुदाई करण्याऐवजी संरक्षक भिंत बांधण्याची सूचना भिमराव माधव यांनी केली. या प्रश्नाबाबत वरीष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक आयोजित करून त्या बैठकीला तीन्ही आमदार तसेच खासदारांनाही उपस्थित ठेवण्याबाबतची सूचना आजरा तालुका शेतकरी संघाचे चेअरमन सुधीर देसाई यांनी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी म्हणाले, वन्यप्राणी आणि माणसांचा संघर्ष तीव्र होण्याला माणूसच जबाबदार आहे. जैवसाखळी मोडली असल्याने वन्यप्राणी शेतात तसेच मानवी वसाहतीत येत आहेत. यावर ठोस उपाय योजना आखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. तालुक्याला तीन आमदार असले तरी आपले प्रश्न आणि आपल्या समस्यांसाठी आता आपणच एकवटले पाहिजे. प्रत्येकाचे राजकीय किंवा वैचारीक मतभेत असले तरी तालुक्याच्या प्रश्नांसाठी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे शिंपी यांनी सांगितले. तर कॉ. संपत देसाई यांनी यामध्ये पुढाकार घेऊन वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक आयोजित करावी आम्ही सर्वपक्षिय मंडळी या बैठकीला उपस्थित राहून समस्या मांडू अशी हमीही त्यांनी दिली.

यावेळी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, पंचायत समिती सदस्य उदयसिंह पवार, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, जनता बँकेचे संचालक रणजित देसाई, बाबासो नाईक, आजरा कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, सूतगिरणीचे संचालक राजू पोतनीस, कॉ. संजय तर्डेकर, आप्पासाहेब सरदेसाई, धोंडीराम परीट, हरी सावंत, राजू होलम, वाय. बी. चव्हाण, विलास पाटील, विश्वास जाधव, एस. पी. कांबळे, धमेंद्र कांबळे, बाळासाहेब तर्डेकर, वृषाल हुक्केरी, अनिकेत कवळेकर, नारायण भडांगे यांच्यासह तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागातील शेतकरी तसेच सर्वपक्षिय कार्यकर्ते उपस्थित होते.