|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » 2007 विश्वचषकातील अपयश सर्वात निराशाजनक : सचिन

2007 विश्वचषकातील अपयश सर्वात निराशाजनक : सचिन 

वृत्तसंस्था/ मुंबई

2007 आयसीसी वनडे विश्वचषकातील अपयश सर्वात निराशाजनक होते. शिवाय, हाच कालावधी भारतीय क्रिकेटसाठी सर्वात निचांकी होता, असे स्पष्ट प्रतिपादन महान फलंदाज, माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने केले. ‘2007 मधील त्या अपयशी विश्वचषकानंतर संघात अनेक व्यापक फेरबदल झाले आणि त्यानंतरच्या कालावधीत त्याची उत्तम पोचपावती भारतीय क्रिकेटला लाभली’, याचा त्याने यावेळी उल्लेख केला. 2007 मध्ये कॅरेबियन भूमीत झालेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर, सचिन बोलत होता. ‘माझ्या मते, 2006-07 या कालावधीत आम्ही सांघिक दृष्टिकोनातून सर्वात खराब कालखंड अनुभवले. 2007 मधील त्या विश्वचषकात आम्हाला सुपरएट फेरी देखील गाठता आली नाही. पण, तेथून परतल्यानंतर नवे विचार अंमलात आणले गेले व तेथून पुढे आम्हाला मागे वळून पाहावे लागले नव्हते’, असे या दिग्गज फलंदाजाने यावेळी नमूद केले.

‘ते अपयश मागे सारण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागतील, हे निश्चित होते. संघ या नात्याने कोणती उद्दिष्टय़े गाठायची, ते ठरले आणि त्यानुसार काटेकोर अंमलबजावणी सुरु झाली होती. अर्थात, मला स्वतःला विश्वकरंडक उंचावण्यासाठी कारकिर्दीतील तब्बल 21 वर्षे प्रतीक्षा करावी लागली’, असे सचिन एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.

2007 मधील विश्वचषकात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला साखळी फेरीत बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावे लागले व यामुळे साखळी फेरीतच भारताची वाटचाल संपुष्टात देखील आली. त्यानंतर 2011 मध्ये भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला, त्यावेळी देखील सचिन भारतीय संघाचा सदस्य राहिला.

Related posts: