|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिलांची बेल्जियम कनिष्ठ पुरुष संघाशी बरोबरी

भारतीय महिलांची बेल्जियम कनिष्ठ पुरुष संघाशी बरोबरी 

वृत्तसंस्था/ ऍन्टवर्प-बेल्जियम

शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षपूर्ण झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाला बेल्जियमच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाविरुद्ध 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. वास्तविक, राणीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अवघ्या 40 व्या सेकंदालाच पेनल्टी कॉर्नर मिळवला. पण, नंतर याचे त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नव्हते. दोन मिनिटांच्या अंतराने बेल्जियन गोलरक्षकाने भारताची आणखी एक संधी निष्फळ ठरवली होती.

दुसरीकडे, बेल्जियन संघाने अवघ्या 6 मिनिटात 3 पेनल्टी कॉर्नर मिळवत एकच खळबळ उडवली. केवळ गोलरक्षक सविताने त्यांना आघाडी घेण्यापासून रोखून धरले होते. आघाडी फळीतील वंदना कटारियाने स्ट्रायकिंग सर्कलमध्ये गोल नोंदवण्याची नामी संधी निर्माण केली. पण, भारतीय संघ तेथे गोल करु शकला नाही व पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी कायम राहिली. दुसऱया सत्रात बेल्जियम संघाने पझेशनच्या आघाडीवर वर्चस्व गाजवले. नंतर 19 व्या मिनिटाला त्यांच्या स्टॅन ब्रॅनिकीने खातेही उघडून दिले. दुसऱया सत्राच्या अखेरीस भारताची पेनल्टी कॉर्नरची संधी निष्फळ गेली. त्यामुळे, सत्राअखेर बेल्जियमची आघाडी भक्कम राहिली.

तिसऱया सत्रात निक्की प्रधानने 36 व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला बरोबरी साधून दिली. या सत्रात मिडफिल्डर नेहा गोयल संघाला आघाडी मिळवून देण्यात जवळपास यशस्वी झाली होती. पण, बेल्जियन गोलरक्षकाने तिचे प्रयत्न हाणून पाडले. 43 व्या मिनिटाला मॅथ्यू डे लाएतने अप्रतिम मैदानी गोल साकारत बेल्जियमला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांचा हा आनंदही फार काळ टिकला नाही. वंदना कटारियाने 54 व्या मिनिटाला पूर्ण खेळ होण्यासाठी अगदी थोडा कालावधी बाकी असताना गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेतला आणि यामुळे भारताने 2-2 अशी बरोबरीही साधली.

बेल्जियमला यावेळी पेनल्टी कॉर्नर बहाल केला गेला होता. मात्र, रजनीने उत्तम बचाव केल्यानंतर बचावपटू सुनीता लाक्राने चेंडू बॉक्सच्या बाहेर परतावून दिल्याने धोका टळला. सध्या युरोप दौऱयावर असणारा भारतीय महिला संघ यानंतर उद्या (दि. 14) महिला डेन बॉश्च संघाविरुद्ध स्वतःची ताकद आजमावणार आहे.

Related posts: