|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपाने मनपा निवडणूकीचे बिगुल वाजवले, काँग्रेस राष्ट्रवादी अद्याप कोमातच

भाजपाने मनपा निवडणूकीचे बिगुल वाजवले, काँग्रेस राष्ट्रवादी अद्याप कोमातच 

रावसाहेब हजारे / सांगली

  सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक सहा ते सात महिन्यावर आली असतानाच सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीत अद्याप शांतताच आहे. नेत्यांची शांतता कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढवत असतानाच भाजपाने मात्र महापालिकेवर कमळाचा झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे. माजी शहराध्यक्ष शेखर इनामदार यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने कार्यकर्ते आणि नेत्यांचा मेळावा आयोजित करून नेत्यांनी निवडणूकीचा बिगुल वाजवला. त्याचबरोबर पक्षाने केलेल्या सर्व्हेचा कल आपल्यासाठी अनुकूल असल्याने नेत्यांमधील            बेकी मिटवण्याचेही जाहीर संकेत देण्यात आले. त्यामुळे महापालिकेत सध्या अस्तित्वहीन असणाऱया भाजपा नेते आणि कार्यकर्ते महापालिकेत ‘ब्रॅण्डेड कमळ’ फुलवण्यासाठी रिचार्ज झाले आहेत.

   महापालिका निवडणूकीची धुरा शेखर इनामदार यांच्या खांद्यावर सोपवा आणि निश्चिंत रहा असे आवाहन आ.सुधीर गाडगीळ यांनी भाजपा नेत्यांना जाहीरपणे केले. तर मनपा निवडणूकीपुर्वी इनामदार यांना एखादे महामंडळ अथवा आमदारकी देण्याची मागणी काहींनी केली. पंचायत समिती,जिल्हापिरषद,मनपा,नपा, इतकेच नव्हे तर देशातील सर्व महत्वाची सत्तास्थाने भाजपाच्या हातात आहेत. त्यामुळे विरोधकही सध्या 2019 ऐवजी 2024ची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. असा टोला मारत आगामी सर्वच महापालिका सोडा पण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची नांदेड महापालिकाही जिंकण्याचा विश्वास महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत बॅण्डेड भाजपाचा महापौर होण्यास अडचण येणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचे आणि नियोजनाची सुचनाही त्यांनी केली.

 खा.संजयकाका पाटील यांनीही महापालिका निवडणूकीला स्पर्श करत नुकतीच आपली अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना कुरणे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगितले . महापालिका निवडणूकीत कसल्याही परिस्थिती भाजपाचीच सत्ता आली पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र बसून काही निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे खा.पाटील यांनी सांगितले. एकूणच भाजपा नेत्यांनी  या मेळाव्याच्या निमीत्ताने ताकाला जाऊन मोगा लपवण्याची भुमिका घेतली नाही. निवडणूकीचा बिगुल वाजवून भाजपाने तयारी सुरू केली आहे.पण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अद्याप फारशा हालचाली दिसत नाहीत.

 महापालिकेत पुन्हा आपलीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त करत काँग्रेस कारभाऱयांना भाजपामधील एक गट आपल्याला मदत करेल असा विश्वास आहे. याशिवाय डॉ.पतंगराव कदम यांनीही अद्याप पत्ते खोलले नसल्याने काँग्रेस इच्छूकांमधील अस्वस्थता वाढीला लागली आहे. राष्ट्रवादी नेतृत्वाची धुरा आ.जयंतराव पाटील यांच्याकडे असली तरी त्यांच्या गोटातही अद्याप ऑलबेल नाही. विरोधी पक्षनेता निवडीपासून उठलेले वावटळ अद्याप कायम आहे. एकूणच आक्रमक झालेल्या भाजपापुढे  काँग्रेस राष्ट्रवादीतील शांतता इच्छूकांची अस्वस्थता वाढवणारी ठरली आहे.

 आ.सुधीर गाडगीळ यांनी 33 कोटींच्या 147 रस्त्यांच्या कामांच्या बंपर निवीदा प्रसिध्द केल्या आहेत. एका बाजूला मनपावर कमळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी सुरू असतानाच नेत्यांमधील अंतर्गत वादाची किनार कायम असल्याने दुसऱया आणि तिसऱया फळीतील कार्यकर्तेही  अस्वस्थ आहेत. भाजपाच्या लाटेत सहभागी होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील अनेक नगरसेवकांसह कारभाऱयांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. पण भाजपाने बहुतांशी नव्या चेहऱयांना संधी देऊन लंबी रेस साठी कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.

 

Related posts: