|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बुलेट ट्रेनसाठी मदत करण्यास चीन तयार

बुलेट ट्रेनसाठी मदत करण्यास चीन तयार 

चर्चा सुरू असल्याचे केले वक्तव्य :

वृत्तसंस्था/ बीजिंग

जपानच्या सहकार्याने भारतात बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा कार्यारंभ होईल. या अगोदर याच मुद्यावर चीनचे वक्तव्य समोर आले. जलदगती रेल्वे प्रकल्पांमध्ये भारताची मदत करण्यास इच्छुक असल्याचे चीनने बुधवारी म्हटले. जलदगती रेल्वे प्रकल्पासाठी चीनने अगोदरच प्रस्ताव दिला असला तरी भारताने जपानला प्राधान्य दिले. चीनने पुन्हा एकदा यासाठी इच्छा व्यक्त केली असली तरीही भारताने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

जलदगती रेल्वे तंत्रज्ञानाचे मार्केटिंग (विपणन) चीन मोठय़ा प्रमाणात करत असतो. जगाच्या अनेक देशांमध्ये चीनने यासाठी मोहीम देखील राबविली. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाला मूर्त रुप देण्याची घोषणा झाली. यानंतर चीनने हा प्रकल्प प्राप्त करण्याकरता मोठी लॉबिंग देखील केली होती.

नवी दिल्ली आणि चेन्नईदरम्यानच्या जलदगती रेल्वे प्रकल्पाकरता चीनने मोठी मेहनत घेतली. या प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न चीनकडून अजूनही होतोय. परंतु भारताने पुढील प्रकल्पाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न

चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांना बुधवारी भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी प्रश्न विचारण्यात आला. क्षेत्रीय सहकार्य वाढविण्यावर लक्ष देण्याची आमची इच्छा आहे. या क्षेत्राच्या देशांना बुलेट ट्रेनने जोडण्यासाठी मदत करण्यास चीन तयार आहे. भारत आणि क्षेत्रातील इतर देशांना याप्रकरणी मदत करू इच्छितो. भारतासोबत व्यवहारिक सहकार्याची गरज असून याकरता चर्चा सुरू आहे. ही चर्चा लवकरच निष्कर्षावर पोहोचेल अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

चीनकडून कार्य सुरू

जलदगती रेल्वे प्रकल्पांबाबत निर्णय घेणाऱया प्राधिकरणांशी चीन बोलणी करतोय. भारताच्या रेल्वे अभियंत्यांना चीनमध्ये प्रशिक्षण दिले जाते. भारताच्या काही रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण देखील चीनकडून होतेय, त्याचबरोबर रेल्वे विद्यापीठासाठी तांत्रिक सहाय्य पुरविले जात असल्याची माहिती शुआंग यांनी दिली. जगातील सर्वात मोठे जलदगती रेल्वेजाळे चीनमध्येच आहे.

Related posts: