|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग हळबे कॉलेजला नॅकचे बी मानांकन

दोडामार्ग हळबे कॉलेजला नॅकचे बी मानांकन 

वार्ताहर / दोडामार्ग :

येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्विकृती (नॅक) बेंगलोरचे बी मानांकन मिळाले आहे. नॅकने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने 18 व 19 ऑगस्ट 2017 रोजी महाविद्यालयाला भेट देऊन आपला अहवाल सादर केला होता. त्याचा निकाल मंगळवारी झालेल्या नॅकच्या 27 व्या स्थायी समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.

काकतीय व पालामरू विद्यापीठ तेलंगणाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. गोपाळ रेड्डी, गोविंद वल्लभपंत मेमोरियल गव्हर्मेन्ट महाविद्यालय शिमलाचे माजी प्राचार्य डॉ. एस. बी. नेगी व बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसीचे हिंदी विभागप्रमुख डॉ. अशोक सिंग यांच्या समितीने भेटीदरम्यान महाविद्यालयाने मागील पाच वर्षांत राबविलेल्या अभ्यासक्रम, अभ्यासक्रमपूरक व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रमांचा आढावा घेतला. दोडामार्गसारख्या दुर्गम भागातील तरुणांना विशेषत: मुलींना उच्चशिक्षण उपलब्ध करून देताना राबविलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे ‘युवती स्वयं निर्भर निधी’चे विशेष कौतुक केले. नॅकच्या बी मानांकनाबरोबरच हळबे महाविद्यालयाने जिल्हय़ातील इतर अनुदानित महाविद्यालयाच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. नॅकचे मानांकन हे महाविद्यायाच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरले असून भविष्यात आणखी दर्जेदार उच्चशिक्षण व त्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अतिमहत्त्वाचे ठरणार आहे. विशेषत: विद्यापीठ अनुदान मंडळ (दिल्ली) च्या यादीत समावेश होण्यासाठी महाविद्यालय प्राप्त ठरले आहे.

महाविद्यालयाने प्रथम प्रयत्नातच यश मिळविल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेटय़े, उपाध्यक्ष अशोक बेलसरे व इतर सदस्य तसेच महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, नॅकचे समन्वयक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सोपान जाधव, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नॅकसाठीची पूर्वतयारी करताना महाविद्यालयाला रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव व इतरांचे मार्गदर्शन मिळाले.

नॅकचे उत्कृष्ट मानांकन मिळविण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी अभिनंदन केले.