|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शक्तिपरीक्षण : 20 सप्टेंबरपर्यंत स्थगिती

शक्तिपरीक्षण : 20 सप्टेंबरपर्यंत स्थगिती 

चेन्नई/ वृत्तसंस्था :

मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडू विधानसभेत पुढील बुधवारपर्यंत ई. पलानीसामी सरकारद्वारे शक्तिपरीक्षण घेण्यास स्थगिती दिली. शक्तिपरीक्षणाच्या अगोदर अण्णाद्रमुकच्या 19 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा आदेश देणार की नाही हे सांगण्याच्या स्थितीत नसल्याचे विधानसभेच्या सभापतींनी न्यायालयाला कळविले. सभापतींच्या भूमिकेनंतर न्यायालयाने शक्तिपरीक्षणाला 20 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली.

आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार की नाही हे सांगण्यास सभापती तयार नाहीत. अशा स्थितीत राज्यपालांकडून महाधिवक्ते निर्देश मिळवेपर्यत शक्तिपरीक्षणाला स्थगिती देणेच योग्य असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले.

विधानसभेत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्यासाठी राज्यपालांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका द्रमुकने दाखल केली. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली असता अण्णाद्रमुकच्या 19 बंडखोर आमदारांना सभापतींनी अपात्र ठरविल्याच्या शंकेमुळे न्यायालयाने सुनावणी दुपारपर्यंत टाळली. याचिकाकर्त्यांच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर सभापतींकडून मत मागवावे अशी सूचना न्यायालयाने महाधिवक्त्यांना केली. सभापतींनी बंडखोर आमदारांना अपात्र ठरविल्यानंतरच सरकार बहुमत सिद्ध करेल असा संशय याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला होता.

दुपारी सव्वा दोन वाजता सुनावणी पुन्हा सुरू झाल्यावर महाधिवक्त्यांनी सभापती आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत असून न्यायालयाला कोणत्याही प्रकारचे वक्तव्य देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने विधानसभेतील शक्तिपरीक्षणाला 20 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली.