|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राजारामपुरीमध्ये चोरटय़ांचा धुमाकूळ

राजारामपुरीमध्ये चोरटय़ांचा धुमाकूळ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   राजारामपुरी परिसरातील किराणा माल, गारमेंट दुकानासह 5 दुकानांचे शटर उचकटून चोरटय़ांनी रोख रक्कमेसह, कपडे असा लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला.  बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजारामपुरी परिसरातील दुकाने चोरटय़ांनी लक्ष करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. दरम्यान या चोऱयांमध्ये महिला चोरटय़ांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

   राजारामपुरी 12 व्या गल्लीमध्ये आदिनाथ भूपाल तपकीरे (वय 48 रा. सायबर चौक) यांच्या मालकीचे आदिनाथ ट्रेडर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे 10 वाजता तपकीरे दुकान बंद करून गेले होते. गुरूवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे दोन्ही लॉक गॅस कटरच्या सहाय्याने तोडल्याचे दिसून आले. तसेच शटर उचकटल्याचे निदर्शनास आले. दुकानाच्या कॅशबॉक्समधील 10 हजार रूपयांची चिल्लर, तसेच इतर 15 हजार रूपये असे सुमारे 25 हजार रूपये चोरटय़ांनी लंपास केले.

   राजारामपुरी 2 ऱया गल्लीमध्ये विजय किशोर नलवडे (वय 31 रा. प्रतिभानगर) यांच्या मालकीचे ऍटीटय़ूड गारमेंट नावाचे रेडीमेड कपडय़ाचे दुकान आहे. गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुकानातील काही माल नेण्यासाठी नलवडे दुकानात आले होते. यावेळी त्यांना दुकानाचे शटर अर्धवट उघडलेल्या स्थितीमध्ये दिसले. त्यांनी जवळ जावून पाहिले असता शटरचे दोन्ही कुलुप गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले होते. विजय नलवडे यांनी दुकानामध्ये जावून पाहिले असता कॅशबॉक्समधील रोख 500 रूपये नसल्याचे नलवडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी स्टॉकची मोजदाद केली असता सुमारे 1 लाख रूपयांचे कपडे नसल्याचे नलवडे यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ राजारामपुरी पोलीसांना या घटनेची माहिती दिली. मात्र याबाबतचा गुन्हा रात्री उशीरापर्यंत दाखल करण्यात आला नाही.    लकी बाझार शेजारी असणारे एक किराणा मालाचे दुकानही चोरटय़ांनली लक्ष केले. तर राजारामपुरी 2 री व 4 थ्या गल्लीमधील दोन कपडय़ांची दुकानेही चोरटय़ांनी फोडली. मात्र याबाबत माहिती देण्यास राजारामपुरी पोलिसांनी टाळाटाळ केली. बुधवारी मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत पावसाने शहराला  झोडपून काढले होते. याचदरम्यान चोरटय़ांनी डाव साधल्याची चर्चा दुकानदारांमध्ये होती.  

सलग दुसऱया दिवशी चोरटय़ांचा धुडगुस

नविन वाशी नाका, मोहिते पार्क परिसरामध्ये चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन ते चार ठिकाणी चोरी केली होती. यामध्ये तीन बंगल्यांसह एका साडी दुकानाचा समावेश होता. यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये राजारामपुरी परिसरातील दुकाने चोरटय़ांनी लक्ष करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

रेकॉर्डवरील महिलांच्या टोळीने केल्या चोऱया

चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील काही ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यावेळी काही रेकॉर्डवरील महिला संशयास्पदरित्या राजारामपुरी परिसरामध्ये फिरताना आढळून आल्या. त्यांनीच या चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.