|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मंगसुळीत रात्रीत चार ठिकाणी चोरी

मंगसुळीत रात्रीत चार ठिकाणी चोरी 

वार्ताहर/ शेडबाळ

मंगसुळी येथे एका रात्रीत चार ठिकाणी चोरी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीत चोरटय़ांनी एका पतसंस्थेत तर तीन दुकानात डल्ला मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती केवळ 1500 रुपयांची रोकड हाती लागली. घटनास्थळी कागवाड पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेमुळे परिसरातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 या घटनेविषयी अधिक माहिती अशी, चोरटय़ांनी शनिवारी मध्यरात्री गावातील एका पतसंस्थेचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रक्कमेची शोधाशोध केली. पण तेथे त्यांना काहीच हाती न लागले नाही. यानंतर चोरटय़ीं शेजारच्या सागर दत्ता भोई यांच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथील त्यांनी एक हजारांचे रोकड लंपास करुन दुकानातील साहित्य विस्कटले. त्यानंतर विनायक आनंदराव पाटील यांचे भांडय़ाचे दुकान फोडले पण तेथे चोरटय़ांच्या हाती रक्कम लागली नाही.

बसस्थानकावरील हरी पांडुरंग पाटील यांची पानटपरी फोडून तेथील 500 रुपयांची चिल्लर लंपास केली. त्या दुकानाच्या बाजुला असणाऱया रवी पाटील यांच्या स्टेशनरीचे कुलूप तोडण्याचा चोरटे प्रयत्न करत असताना दुकानासमोरील रहिवासी कुसुम सुतार यांना आवाज आल्याने त्या घराबाहेर आल्या. त्यांनी चोरटय़ांना पाहून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरटय़ांनी तेथेच लोखंडी रॉड व पक्कड टाकून पलायन केले. 

या घटनेची व्यापारी असोसिएशनचे चेअरमन जयसिंग पाटील तसेच ग्रा. पं. अध्यक्ष बाबासाहेब पाटील व इतर पंचायत सदस्यांनी कागवाड पोलिसांना दिली. पीएसआय समीर मुल्ला व त्यांच्या सहकाऱयांनी पतसंस्थेसह चोरी झालेल्या दुकानांची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी गावात गस्त घालण्यात यावी, अशी मागणी केली.

काही दिवसांपूर्वी कॅनॉलभागात चोरी

येथील कॅनॉलभागात काही दिवसांपूर्वी बशीर मुल्ला यांची पाण्यात असणारी विद्युत मोटार चोरीला गेली होती. ती घटना ताजी असतानाच पुन्हा चोरीची घटना उघडकीस आल्याने नागरिकातून चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी सदर चोरटय़ांना पकडण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Related posts: