|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दाबोळी विमानतळावर 39 लाखांचे चलन जप्त

दाबोळी विमानतळावर 39 लाखांचे चलन जप्त 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर दोघा हवाई प्रवाशांकडून 39 लाख रूपयांचे विदेश चलन जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी सकाळी गोवा कस्टम विभागाच्या पथकाने केली.

 या कारवाईसंबंधी कस्टम विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार कस्टम विभागाच्या दाबोळी विमानतळावरील अधिकाऱयांच्या पथकाला विदेशी चलनासंबंधी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रवाशांवर कस्टमच्या अधिकाऱयांनी पाळत ठेवली होती. या पाळतीच्या वेळी दोघा प्रवाशांबाबत या अधिकाऱयांचा संशय बळावल्याने त्यांनी त्यांची चौकशी केली व त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 39 लाखांचे विदेशी चलन सापडले. हे चलन त्यांनी पाठीला लावलेल्या आपल्या बॅगांच्या एका छुप्या कप्प्यात लपवले होते. भारतीय रूपयाच्या मुल्यानुसार या विदेशी चलनाची किंमत सुमारे 39 लाख रूपये आहे. कस्टम अधिकाऱयांनी हे चलन जप्त केले आहे.

  हे दोघे हवाई प्रवासी कोण व कुठले तसेच त्यांच्याविरूध्द गुन्हे नोंद केले आहेत काय की नाही, याबाबत कोणतीही माहिती कस्टम विभागाने उघड केलेली नाही. मात्र, हे दोघे पवासी सोमवारी सकाळी दाबोळी विमानतळावर आले होते. एअर अरेबियाच्या विमानाने ते शारजाला उड्डाण करण्याच्या प्रयत्नात होते. कस्टमला विदेश चलनालाबाबत माहिती मिळाल्याने ते तावडीत सापडले. गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त जी.बी. सांतीमोनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोवा कस्टम विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या सर्वकष मार्गदर्शनाखाली कस्टमचे अधिकारी या पकरणी पुढील तपास करीत आहेत.

    मागच्या तीन महिन्यांच्या काळात गोवा कस्टम विभागाने सोने तस्करीची चार प्रकरणे नोंद करून 1 कोटी 42 लाख रूपये किमतीचे 4 किलो 6 गॅम सोने हवाई प्रवाशांकडून जप्त केले आहे. कस्टम विभागाने एका हवाई प्रवाशाकडून 5 किलो गांजाही जप्त केला होता.