|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामलिंगखिंड गल्लीतील पार्किंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी

रामलिंगखिंड गल्लीतील पार्किंग व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी 

बेळगाव / प्रतिनिधी

रामलिंगखिंड गल्लीतील रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी न होता पार्किंगसाठी होत आहे. व्यावसायिक व रहिवाशांच्या प्रवेशद्वारावरच वाहने पार्क करण्यात येत असल्याने पार्किंगला शिस्त लावण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यानुसार रहदारी पोलीस प्रशासनाने मंगळवारच्या मुहूर्तावर मोहीम राबविली. पण दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे पार्किंग एकाच बाजूला करण्याचा प्रयोग राबविण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

रामालिंगखिंड गल्लीतील रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर दुतर्फा चार चाकी आणि दुचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. यामुळे येथील रस्त्याचे रुंदीकरण  पार्किंगसाठी करण्यात आले का? असा प्रश्न येथील रहिवासी करीत आहेत.  दोन्ही बाजूने पार्क करण्यात येणारी वाहने व्यावसायिक आणि रहिवाशांना डोकेदुखीची बनली आहे. व्यावसायिक, रहिवासी आणि वाहनधारकांमध्ये रोज भांडणे होत आहेत. याची दखल घेऊन मध्यंतरी रहदारी पोलिसांनी रस्त्यावर पांढऱया रंगाने मार्किंग करण्याचा प्रयत्न केला. पण बेशिस्त वाहनचालकांनी मार्किंगप्रमाणे वाहने पार्क केली नाहीत. यामुळे शिस्त लावण्याची मोहीम गेल्या सहा महिन्यांपासून रखडली होती.

पार्किंगबाबतच्या तक्रारी वाढल्याने वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न मंगळवारी पुन्हा एकदा झाला. पण यावेळी एका बाजूला बॅरिकेड्स लावून वाहने पार्किंग करण्यास मज्जाव करण्यात आला होता. दुसऱया बाजूला दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क करण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. एका बाजूला दुचाकी आणि दुसऱया बाजूला चार चाकी वाहने पार्क करण्यासाठी व्यवस्थित मार्किंगची गरज आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिकांना आणि रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रस्ता सोडून उर्वरित जागेत वाहने पार्क करण्यासाठी मार्किंग करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचे नियोजन रहदारी पोलीस प्रशासनाने करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मंगळवारी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या पार्किंग सुविधेमुळे वाहनधारकांसह रहदारी पोलिसांनाही कसरत करावी लागली.